१३६ वर्षांची जत्रोत्सवाची परंपरा खंडित होणार?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 एप्रिल 2019

एक नजर

 •   मंडणगड-धुत्रोलीतील वाद 
 •   हनुमान मंदिर जागेचा प्रश्न
 •   मूर्ती स्थलातंराबाबत आक्षेप
 •   अर्थकारणावर होणार परिणाम
   

मंडणगड - तालुक्‍यातील धुत्रोली-हनुमानवाडी येथील हनुमान मंदिराच्या जागेचा प्रश्‍न व मूर्ती स्थलातंराचा दोन गटात निर्माण झालेला वाद यामुळे पोलिस प्रशासनाने गावात १४४ कलमांतर्गत १७ ते २० एप्रिल या कालावधीसाठी बंदी आदेश लागू केला आहे. परिणामी तालुक्‍यातील सर्वांत जुनी १३६ वर्षांची परंपरा असलेला धुत्रोली हनुमानवाडी जत्रोत्सव यंदा खंडित होण्याची शक्‍यता आहे. 

जत्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर नव्याने सुरू झालेल्या वादामुळे तालुक्‍यातील सर्वात मोठी गर्दीचा उच्चांक मोडणारी जत्रा होणार नाही. त्याचा परिणाम तालुक्‍यातील सांस्कृतिक जीवनावर, जत्रेच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या अर्थकारणावर होणार आहे. धुत्रोली-हनुमानवाडी येथे हनुमान मूर्ती असलेल्या दोनशे मीटरच्या परिसरात व संपूर्ण हनुमानवाडी परिसरात जयंती उत्सवास बंदी आदेश लागू करण्यात आला. या संदर्भात संजय पांडुरंग सुगदरे, चंद्रकांत शिवराम घाग, विजय पांडुरंग सुगदरे, विजय भाऊराव सुगदरे यांचा एक गट आणि संजय नथुराम सुगदरे, मनोहर बाबूराव सुगदरे, चंद्रकांत धोंडू मळेकर, अनंत राजाराम सुगदरे, किरण रमेश पोतदार (सर्व रा. हनुमानवाडी, धुत्रोली) यांचा दुसरा गट यांना नोटीस बजावण्यात आली आहे. 
या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चार वर्षांपूर्वी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी मूर्ती अन्यत्र हलवण्यात आली. 

यानंतर मंदिराच्या जागेच्या वादावर सामोपचाराने तोडगा काढण्यात आला होता. त्यानंतर या वर्षीच्या जत्रेचे नियोजन दोन्ही गटांनी एकत्र येऊन केले होते; मात्र १६ एप्रिलला नवीन जागेत हलवण्यात आलेली मूर्ती जुन्या जागी स्थलांतरित करून जत्रोस्तव साजरा करावा, असे मत पुढे आले. जीर्णोद्धारातील आसन व घुमटाचे काम पूर्ण करून नंतरच मूर्ती जुन्या जागेवर बसवावी, असा दुसरा मतप्रवाह आहे. त्यामुळे तेढ वाढत गेली. यावर प्रशासनाच्या मध्यस्थीनंतरही तोडगा न निघाल्याने तहसीलदार प्रशांत पानवेकर यांनी गावात मनाई आदेश लागू केले.

मंदिरावर मनाई आदेशाची प्रत
विभागीय पोलिस अधिकारी प्रवीण पाटील, पोलिस निरीक्षक उत्तम पिठे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर व गावच्या परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वाडीतील दोन्ही मंदिरांवर मनाई आदेशाची प्रत लावण्यात आली आहे.

 •   मंडणगड-धुत्रोलीतील वाद 
 •   हनुमान मंदिर जागेचा प्रश्न
 •   मूर्ती स्थलातंराबाबत आक्षेप
 •   अर्थकारणावर होणार परिणाम
   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhutroli Hanumanwadi place issue