काळे-निळे पडलेले बाळ रडले,अन सारे हसले 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

शहरातील वरचीपेठ येथील अरुणा नवीनकुमार सांखला (पटेल) ही महिला गत मंगळवार दुपारी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली. यावेळी डॉ. मेस्त्री यांनी तपासणी केली असता सोनोग्राफीमध्ये बाळाचे वजन 3 किलोपेक्षा जास्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

राजापूर ( रत्नागिरी ) - सुमारे साडेतीन किलोहून अधिक वजनाचे पायाळू अर्भक, प्रसुतीच्यावेळी मातेचा रक्तदाब वाढलेला अशा गुंतागुंतीच्या स्थितीतही प्रसूती झाली. मात्र, काळे - निळे पडलेल्या नवजात अर्भकाची जन्मापासून मृत्यूशी झुंज सुरू झाली होती. राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राम मेस्त्री यांनी वैद्यकीय कौशल्य आणि अनुभव पणाशी लावत त्या बालकावर तत्काळ उपचार केले. जन्मल्यानंतर दहा मिनिटांनी बालकाने रडायला सुरवात केली अन्‌ बाळाच्या आई-वडिलांसह साऱ्यांच्याच चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले. 

शहरातील वरचीपेठ येथील अरुणा नवीनकुमार सांखला (पटेल) ही महिला गत मंगळवार दुपारी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली. यावेळी डॉ. मेस्त्री यांनी तपासणी केली असता सोनोग्राफीमध्ये बाळाचे वजन 3 किलोपेक्षा जास्त असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. महिलेला प्रसूती वा उपचारासाठी रत्नागिरी येथे पाठविणे धोक्‍याचे होते. वाटेतच प्रसूती झाली असती तर बाळ व बाळंतीण अशा दोघांच्याही जिवाला धोका होण्याची शक्‍यता होती. त्यामुळे डॉ. मेस्त्री यांनी वस्तुस्थिती सांगून रुग्णालयात प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. अति उच्च रक्तदाबावरील औषधोपचार व बाळंतपणासाठी औषधोपचार केले. 

काही कालावधीमध्ये पायाळू बाळाला मानेपर्यंत सुखरूप बाहेर काढण्यात त्यांना यश आले. बाळाचे वजन जास्त असल्याने डोके अडकून राहिले होते.10 मिनिटांनंतर प्रसूती यशस्वी झाली. मात्र, बाळाची कोणतीच हालचाल होत नव्हती. बाळाचे शरीर निळसर झाले होते.डॉ. मेस्त्री यांनी कृत्रिम श्वासोच्छवास देऊन बाळाचे रिसक्‍शीटेशन केले. बाळाला नाळेमधून जीवनावश्‍यक इंजेक्‍शन दिले. त्यानंतर काही मिनिटांमध्ये बाळाने पहिला श्वास घेतला.

त्यानंतरही कृत्रिम श्वासोच्छवास व आवश्‍यक औषधोपचार सुरूच ठेवले. 10 मिनिटानंतर बाळाने रडायला सुरवात केली. त्यानंतर बाळाला ऑक्‍सिजन देऊन एन. आय. सी. यु. साठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या ऑपरेशन टीममध्ये डॉ. राम मेस्त्री यांच्यासोबत डॉ. जगन गारूडी, डॉ. रूपेश बाईत, स्टाफ नर्स मिशाळे, ए. एन. एम. मासये आदी उपस्थित होते. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Difficult Surgery By Dr Ram Mestry In Rajapur Rural Hospital