डिंगणे ग्रामपंचायतीने केलीये `ही` मागणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 ऑगस्ट 2020

बांदा पोलिसांत पोलिस निरीक्षक अनिल जाधव यांना डिंगणेचे माजी उपसरपंच रोहित नाडकर्णी व विद्यमान उपसरपंच जयेश सावंत यांनी निवेदन दिले.

बांदा ( सिंधुदुर्ग ) - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे गोवा व महाराष्ट्र राज्यांच्या सीमाभागातून जाणारा बांदा-आरोसबाग-नेतर्डे रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद आहे. बांदा बाजारपेठेवर अवलंबून असलेल्या डिंगणे, डोंगरपाल, गाळेल व नेतर्डे गावांतील ग्रामस्थांना सहा किलोमीटरचा अधिकचा प्रवास करावा लागत असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून चारही गावांतील नागरिकांना ओळखपत्र पाहून ये-जा करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी डिंगणे ग्रुप ग्रामपंचायतीतर्फे सावंतवाडी तहसीलदार व बांदा पोलिस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

बांदा पोलिसांत पोलिस निरीक्षक अनिल जाधव यांना डिंगणेचे माजी उपसरपंच रोहित नाडकर्णी व विद्यमान उपसरपंच जयेश सावंत यांनी निवेदन दिले. यात म्हटले आहे की, पत्रादेवी लंगारबाग दत्त मंदिरजवळून बांदा-आरोसबाग-नेतर्डे असा मार्ग आहे. या मार्गे डिंगणे, गाळेल, डोंगरपाल व नेतर्डे गावांची रहदारी मोठ्या प्रमाणावर असते; परंतु सद्यस्थितीत चारही गावांतील ग्रामस्थांना सहा किमीचा अधिकचा प्रवास करत डिंगणे-बांबरवाडीमार्गे बांदा येथे बाजारपेठ तसेच अन्य कामासाठी जावे लागते.

त्यामुळे डिंगणे-बांबरवाडीमार्गे बांदा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची कोंडी होते. एसटी वाहतूक सेवा पूर्णपणे बंद असल्याने खासगी वाहनांद्वारे प्रवास करावा लागत आहे. त्यात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे बांदा-आरोसबाग-नेतर्डे रस्त्यावरून डिंगणे, गाळेल, डोंगरपाल व नेतर्डे गावांतील ग्रामस्थांना ओळखपत्राची पडताळणी करून ये-जा करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी डिंगणे ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आली आहे. 

गणेशोत्सवात होणार दमछाक 

डिंगणे, गाळेल, डोंगरपाल व नेतर्डे गावांतील ग्रामस्थांना गणेशोत्सवासाठी लागणारे साहित्य आणण्यासाठी बांदा बाजारपेठेत यावे लागते; परंतु बांदा-आरोसबाग-नेतर्डे रस्ता वाहतुकीस बंद असल्याने ग्रामस्थांची मोठी दमछाक होणार आहे. प्रशासनाने यावर योग्य तो तोडगा काढून ग्रामस्थांची झालेली अडचण सोडवावी, अशी मागणी उपसरपंच जयेश सावंत यांनी केली आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dingane Grampanchayat Demand Sindhudurg Marathi News