दीपोत्सवामुळे कुणकेश्‍वर मंदिरात लखलखाट

संतोष कुळकर्णी
Thursday, 19 November 2020

लॉकडाउन कालावधीनंतर सोमवारी मंदिर प्रथमच उघडण्यात आले. मंदिर उघडण्यात येणार असल्याने भाविकांमध्ये उत्साही वातावरण होते. पाडव्यादिवशी सोमवार असल्याने आणि त्याच दिवशी मंदिर उघडण्यात येणार असल्याने अनेकांची पावले कुणकेश्‍वरच्या दिशेने वळली होती.

देवगड (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर मंदिरात दीपावली पाडव्याला सोमवारी (ता.16) रात्री मंदिरासह परिसरात दिपोत्सव साजरा करण्यात आला. रोषणाईमुळे मंदिर परिसर उजळून निघाला. सोमवार असल्याने यावेळी विविध ठिकाणच्या भाविकांनी गर्दी केली होती. मंदिरात सुगम संगीताचा कार्यक्रमही सादर करण्यात आला. 

लॉकडाउन कालावधीनंतर सोमवारी मंदिर प्रथमच उघडण्यात आले. मंदिर उघडण्यात येणार असल्याने भाविकांमध्ये उत्साही वातावरण होते. पाडव्यादिवशी सोमवार असल्याने आणि त्याच दिवशी मंदिर उघडण्यात येणार असल्याने अनेकांची पावले कुणकेश्‍वरच्या दिशेने वळली होती. सोमवारी दीपावली पाडव्याचे औचित्य साधून मंदिर आणि परिसरात दिपोत्सव साजरा झाला. मंदिरातील गाभाऱ्यात विविध मान्यवरांच्या हस्ते दीपोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. मंदिरातील गर्भागृह, ध्यानगृह, सभामंडप यासह संपूर्ण मंदिर परिसरात बहुसंख्य दिप उजळण्यात आले होते. 
सोमवार असल्याने भक्‍तांच्या उत्साहाला उधाण आले होते. देवस्थानचे अध्यक्ष संजय वाळके, व्यवस्थापक रामदास तेजम आदी उपस्थित होते. मंदिरात सुधांशू सोमण (मिठबांव) यांचे गायन झाले. त्याला प्रकाश मराठे यांनी हार्मोनियम साथ तर समीर सोमण यांनी तबला साथ केली. अरूण सोमण यांनी निवेदन केले. 

...अन्‌ मंदिर उजळले 
अनेकांचे हात एकाचवेळी जुडले आणि बघताबघता मंदिर परिसर पणत्यांच्या प्रकाशात मंदिर लख्ख उजळून निघाले. या उत्सवादरम्यान आकर्षक विद्युत रोषणाई, रांगोळीचे आकर्षक कलात्मक नमुने पहावयास मिळाले. परिसरात विविध रांगोळ्या साकारल्या होत्या. आकाशाला गवसणी घालणाऱ्या फटाक्‍यांनी अवकाशांत रंग भरल्याने वातावरण अधिकच मोहक बनले होते.  

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dipotsav celebration at Kunkeshwar temple