कारिवडेतील मारहाणीची सभेत चर्चा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

सावंतवाडी - पटसंख्या घटत असताना कारिवडे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसमोर लोकप्रतिनीधींकडून मारहाणीसारखा प्रकार होतो; मात्र शिक्षणाधिकाऱ्यांकडून कसलीच दखल घेतली जात नाही. यातून विद्यार्थ्यांना कोणता आदर्श देणार, असा सवाल पंचायत समिती सदस्य रूपेश राऊळ यांनी केला. झालेला प्रकार निंदनिय आहे याबाबत कुठल्याही प्रकारची तक्रार आलेली नाही; मात्र या घटनेची तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करू, असे आश्वासन सभापती रविंद्र मडगावकर यांनी देत तशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

सावंतवाडी - पटसंख्या घटत असताना कारिवडे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसमोर लोकप्रतिनीधींकडून मारहाणीसारखा प्रकार होतो; मात्र शिक्षणाधिकाऱ्यांकडून कसलीच दखल घेतली जात नाही. यातून विद्यार्थ्यांना कोणता आदर्श देणार, असा सवाल पंचायत समिती सदस्य रूपेश राऊळ यांनी केला. झालेला प्रकार निंदनिय आहे याबाबत कुठल्याही प्रकारची तक्रार आलेली नाही; मात्र या घटनेची तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करू, असे आश्वासन सभापती रविंद्र मडगावकर यांनी देत तशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

येथील पंचायत समितीची पहिलीच मासिक सभा सभापती मडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी व्यासपीठावर उपसभापती निकिता सावंत, गटविकास अधिकारी मोहन भोई, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उबाळे, सार्वजनिक बांधकामच्या अनामिका चव्हाण आदी उपस्थित होते. सभेच्या सुरवातीला गेले कित्येक वर्षे शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे रखडलेली प्रस्तावाबाबत सदस्य श्रीकृष्ण सावंत यांनी आवाज उठवत प्रस्ताव करूनही कनेक्‍शन मिळत नाही तर शेतकऱ्यांनी करायचे काय अशा प्रश्न उपस्थित करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तर विरोधी गटाचे सदस्य रूपेश राऊळ व संदीप गावडे यांनीही या विषय उचलून धरत रखडलेल्या कामांची माहिती सभागृहाला द्या अशी मागणी केली. 

पावसाळ्यात चौकुळ भागात विजेचा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या वायरमनला आपल्या कार्यक्षेत्रात राहण्याचे आदेश द्या अशी मागणी सदस्य मोहन चव्हाण यांनी केली. सोनुर्ली पाक्‍याचीवाडी येथील श्रीहरी नाईक यांच्या आंबा बागेचे गवा रेड्याकडून होणारे नुकसानी बाबत मागील सभेतील विषयावरून नुकसान भरपाईचा प्रस्ताव पंचनाम्याअंती पाटविण्यात आल्याचे वाचन करण्यात आले. यावर सदस्य श्रीकृष्ण सावंत यांनी वन्य प्राण्याचे होणारे नुकसान लक्षात घेता वैयक्तिक लाभ म्हणून शेतकऱ्यांना सौर कुंपण सबसीडीवर देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. याबाबत लवकरच उपवनसंरक्षक यांची भेट घेऊ असे सभापती मडगावकर यांनी सांगितले. 

शाळा दुरूस्तीचे ५८ पैकी १८ प्रस्ताव मंजूर आहेत असे शिक्षणाधिकारी शिवाजी देसाई यांनी सांगितले. यावर सदस्य रूपेश राऊळ म्हणाले विद्यार्थ्यांचा विचार करता पावसाळ्यापुर्वी उर्वरीत कामे मार्गी लावा. तसा पाठपुरावा करावा अशी मागणी त्यांनी केली. लघु पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून गावागावात घालण्यात येणारे बंघारे कोल्हापूरी पध्दतीचे वळवणीचे घालण्यात यावे, शिवाय शेतकऱ्यांच्या हितासाठी नियमात तडजोड करून कामे मार्गी लावा असे श्रीकृष्ण सावंत यांनी संबधित अधिकाऱ्यांना सुचविले.

कमी बोला पण अभ्यासपूर्ण बोला 
नवनिर्वाचित सदस्यांची ही पहिलीच सभा होती. सभापतींनीही सावध भूमिका घेत सभा हाताळली. दरम्यान, एका सत्ताधारी सदस्याकडून पुन्हा पुन्हा प्रश्न उपस्थित करत सभागृहाचा वेळ वाया घालविण्याच्या प्रकाराला सभापती मडगावकर यांनी आळा घालत कमी बोला पण अभ्यासपूर्ण बोला असे सांगत घरचा आहेर दिला.

...तर भोजनगृह तत्काळ हटवा  
जि.प. शाळेत मुलांना खेळण्यासाठीच्या जागेत भोजनगृहे बांधण्यात आली. याबाबत कोणताही सर्व्हे न करता बांधकामे केली. सद्य:स्थितीत किती भोजनगृहात आहार केला जातो, असा सवाल उपस्थित करीत ज्या भोजनगृहात आहार केला जात नाही, अशी भोजनगृहे तत्काळ हटवा अन्यथा लोकप्रतिनीधींना तसे करण्यास भाग पाडावे लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: discussion on beating in kariwade