कोकणात ग्रामीण आरोग्य यंत्रणाही खिळखिळीच

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

शासनाच्या अखत्यारीतील सिव्हिल हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालये यांचेही आरोग्य संपूर्ण बिघडलेले आहे.

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयाप्रमाणेच ग्रामीण आरोग्य यंत्रणाही गेली १० ते १५ वर्षे कोसळलेलीच आहे. कोणीही अधिकारी ही वस्तुस्थिती नाकारणार नाहीत आणि त्याबाबत खुलासाही करणार नाहीत. शासनाच्या अखत्यारीतील सिव्हिल हॉस्पिटल, ग्रामीण रुग्णालये यांचेही आरोग्य संपूर्ण बिघडलेले आहे. पाच आमदार, दोन खासदार आणि त्यांना मिळणारी सत्तेची ताकद याचा वापर करण्याची आणि त्यातून रत्नागिरीमधील आरोग्य यंत्रणा सुस्थितीत आणणे सहज शक्‍य आहे, असे सांगत याकडे ॲड. धनंजय भावे यांनी लक्ष वेधले. 

हेही वाचा -  आंबोली घाटात 'त्या' महिलेचा घातपातच ; चार संशयितांना केले गजाआड

उच्च न्यायालयाने उपाय सुचवण्याचे निर्देश दिले आहेत. भावे म्हणाले, जिल्ह्यातील अनेक वैद्यकीय तज्ज्ञांची, लोकप्रतिनिधींची आणि सामाजिक कार्यकर्त्यांची मते घेऊन, त्यांची एखादी अभ्यास-समिती नेमून आपल्याला शासनाकडे नेमके काय मागवायचे आहे, तेही ठरवावे लागेल. जिल्ह्यामध्ये सुमारे ४० ते ५० प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. त्यांची अवस्था जिल्हा रुग्णालयापेक्षा वेगळी नाही.

एक काळ तेथील वैद्यकीय अधिकारी उत्तम प्रकारची वैद्यकीय सेवा देत होते. आता या आरोग्य केंद्रांकडे जिल्हा परिषद काय लक्ष देते?, येथेही डॉक्‍टरांची कमतरताच, कर्मचारीवर्ग अपुराच. खेडेगावातील गोरगरीब जनता या सर्वात भरडली जात आहे, असेही भावे यांनी सांगितले. सर्वच लोकप्रतिनिधींनी आपापसातील सर्व वैचारिक मतभेद विसरून जिल्हा आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत.

हेही वाचा - ‘ओ तुमचे पैसे आलेले नाहीत’ ; सर्वेक्षण आणि पंचनाम्याच्या कामात ढिसाळपणा 

 

उत्तम पुनर्बांधणी करता येऊ शकते

विद्यमान जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना त्यांच्या वडिलांच्या अनुभवाचा फायदा घेता येऊ शकतो. कोविडनिमित्त जिल्हा परिषदेच्या सर्व आरोग्य केंद्रांचा अहवाल प्राप्त करून घेऊन आपल्या कारकीर्दीत योजनाबद्ध आणि कालबद्ध कार्यक्रम आखून आरोग्य केंद्राची उत्तम पुनर्बांधणी करता येऊ शकते. आपल्या मागण्या जिल्हा परिषद अध्यक्षांनी शासनासमोर नीटनेटकेपणाने मांडणे, हेच महत्त्वाचे आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: district health centres and rural health services not done properly in ratnagiri