‘ओ तुमचे पैसे आलेले नाहीत’ ; सर्वेक्षण आणि पंचनाम्याच्या कामात ढिसाळपणा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

नोंदीत चुका; सर्वेक्षणात पारदर्शकतेचा अभाव, मदतनिधी देताना संमतीपत्रासारख्या अटी

रत्नागिरी : निसर्गग्रस्त भागात मदत पोचण्याबाबत आजही ओरड आहे. पंचनाम्याचं काम पूर्ण झालं असलं तरीही पूर्णतः आणि अंशतः नोंदीत चुका झाल्याने पंचनामे परत करण्याची लोकांची मागणी आहे. मुळातच हे सर्वेक्षण व पंचनाम्याचं काम ढिसाळपणे, दिशाहीन पद्धतीने झालं. झालेल्या सर्वेक्षणाची प्रत वादळग्रस्तांना देणे गरजेचे होते. पण, ती न दिल्याने सर्वेक्षणात पारदर्शकता राहिली नाही. वादळग्रस्तांच्या मनात संशय आहे, असे धीरज वाटेकर यांनी सांगितले.

हेही वाचा - कथित धमकी नाट्य ; सभापतींना संरक्षण अन्‌ शुभेच्छा 

वादळग्रस्त भागातील लोकांशी बोलताना हे जाणवते, असे सांगून वाटेकर म्हणाले, की काही गावांतील पंचनामे पंचायतीत बसून पूर्ण केल्याचा आरोप झाला. नुकसान न झालेल्यांना अधिक मदत मिळाली. प्रत्यक्ष नुकसान झालेले अनेक जण आजही शासकीय मदतीपासून वंचित आहेत. पंचनाम्याच्या फॉर्ममध्येही नुकसानीच्या सविस्तर नोंदी नव्हत्या. यातलं काही काम शिक्षकांनी केलं. त्यांना महसूल विभागाच्या नुकसानाच्या नोंदी कशा असतात, त्यांची आकडेमोड कशी करायची? याची कल्पना नसावी.

कोरोनामुळे अनेक चाकरमानी मेमध्ये गावी आले अन्‌ वादळात गावले. यांना सरकारने मदतनिधी देताना संमतीपत्रासारख्या अटी ठेवल्या. सातबाऱ्यावर एकच नाव असणाऱ्यांचे घर नुकसानीचे पैसे जमा झालेत. पण, कोकणात बहुसंख्य सातबारे सामाईक आहेत. मदत वाटप शेतकऱ्यांच्या हमीपत्रावर व्हायला हवं. शासनाने जाहीर केलेली अंशतः नुकसान झालेल्या घरांसाठीची १५ हजार आणि १० हजार रुपयांची मदत आजही अनेकांना मिळालेली नाही. ज्यांना मिळाली, त्यांना दोन्ही टप्पे मिळाले. नाही त्यांना काहीही नाही.

हेही वाचा -  आंबोली घाटात 'त्या' महिलेचा घातपातच ; चार संशयितांना केले गजाआड

काही लोकांच्या नावात चुका राहिल्या. विचारल्यास निधी नाही म्हणून पैसे मिळालेले नाहीत, असे सांगितले जाते. कोरोनात अर्धा-अर्धा दिवस बॅंकेच्या दारात रांगेत उभं राहिल्यावर जेव्हा नंबर यायचा, तेव्हा पासबुक तपासून ‘ओ ऽऽऽतुमचे पैसे आलेले नाहीत’ हे अनेकदा ऐकावं लागलं. सर्वे झालाय का? वादळग्रस्तांना आलेला धनादेश न मिळालेला कोणी चुकून महसूल विभागात गेला तर तुमचा सर्वे झालाय का, याची पाहणी करा इथपासून ऐकावं लागल्याची खंत केदार पतंगे यांनी बोलून दाखविली.

दृष्टिक्षेपात

- मदतवाटप हमीपत्रावर व्हायला हवं
- अंशतः नुकसान; भरपाईपासून वंचित
- काही लोकांच्या नावात राहिल्या चुका 
- पंचनामे परत करण्याची लोकांची मागणी

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nisarga cyclone suffer people survey completed but the exact registration not done properly and people demand this in ratnagiri