परिस्थितीमुळे कोल्हापूरचा नकाऱ; मग कोकणातील या जिल्ह्याने घेतला ऑक्‍सिजन जनरेशन प्लांट उभारण्याचा निर्णय

विनोद दळवी
Saturday, 12 September 2020

सध्या गोवा सरकारकडून जिल्ह्याला पुरेसा ऑक्‍सिजन मिळत आहे.

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्‍सिजन जनरेशन प्लांट उभारण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजनमधून 72 लाख रुपये मंजूर केले आहेत. यातील 44 लाख रुपये जिल्हा रुग्णालयाला वर्ग केले आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले, ``रुग्णांसाठी आवश्‍यक ऑक्‍सिजन देण्यास कोल्हापूरने नकार दिला असला तरी गोवा सरकारकडून जिल्ह्याला पुरेसा ऑक्‍सिजन मिळत आहे. भविष्यात अन्य जिल्ह्यांवर ऑक्‍सिजनसाठी अवलंबून राहावे लागू नये, यासाठी ऑक्‍सिजन जनरेशन प्लांट उभारण्यात येणार आहे. जिल्हा नियोजनमधून 10 नवीन रुग्णवाहिका मंजूर केल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व पालिकांना शववाहिका देण्यात येणार आहेत. राज्य शासन पाच रुग्णवाहिका देणार आहे.``

जिल्हा दौऱ्यावर असलेल्या सामंत यांनी विविध विषयांच्या अनुषंगाने बैठका घेतल्या. त्यातील निर्णयांची माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत, महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, विकास कुडाळकर, नागेंद्र परब, संदेश पारकर उपस्थित होते. 

श्री. सामंत म्हणाले, "राज्याचे अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजनचा 50 टक्के निधी आरोग्य यंत्रणेवर खर्च करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार रुग्णवाहिका, शववाहिका खरेदीचा निर्णय घेतला आहे. कोरोनापूर्वी जिल्ह्यात केवळ सात व्हेंटिलेटर होते. आता ती संख्या 56 झाली आहे. यातून जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.'' 

ते म्हणाले, "आयुष हॉस्पिटल लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न आहेत, कविवर्य मंगेश पाडगावकर स्मारक गेली चार वर्षे रखडलेले होते. यासाठी एक कोटी 47 लाख रुपयांचा निधी पर्यटन विकास महामंडळाकडे वर्ग केला; मात्र जमिनीचा प्रश्‍न सुटत नव्हता. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या विभागाची बैठक घेऊन हा प्रश्‍न निकाली काढला आहे. मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी स्मारक लवकर सुरू होईल. कुडाळ एसटी डेपोचे कामही लवकर सुरू होईल.'' 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. आमचे सरकार मराठा आरक्षण देण्यासाठी आग्रही आहे. 
- उदय सामंत, पालकमंत्री 

पाच कोटी खर्चून सिंथेटिक ट्रॅक 
मंत्री सामंत म्हणाले, ""सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण समितीची बैठक नुकतीच झाली. यावेळी सिंधुदुर्गनगरी येथे पाच कोटी 23 लाख रुपये खर्च करून सिंथेटिक ट्रॅक उभारण्याचा निर्णय झाला. बॅडमिंटन हॉल व स्विमिंग पूल दुरुस्तीसाठी एक कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. सिंधुदुर्गनगरीत शॉपिंग मॉल उभारण्याचा सुद्धा निर्णय झाला आहे. अद्ययावत जीम उभारण्यात येणार आहे. यासाठी प्राधिकरणकडे निधी उपलब्ध आहे. त्यामुळे निधी नाही म्हणून कामे रखडणार नाहीत. "जिल्हा नियोजन'मधून ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरण व मुख्यालयात राष्ट्रध्वज उभारणे ही कामे लवकरच सुरू होतील.'' 

संपादन : विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This district in Konkan decided to set up an oxygen generation plant