दिवाळी सुटीमुळे बहरले पर्यटन; बुकिंग हाउसफुल्लकडे

कोरोनाची छाया कमी; व्यावसायिकांचा पर्यटन सुविधांवर भर
kokan
kokansakal media

मालवण : दिवाळी सुटीच्या पार्श्‍वभूमीवर येथील पर्यटन बहरले आहे. पर्यटकांच्या स्वागताबरोबर दर्जेदार सुविधा देण्यावर पर्यटन व्यावसायिकांनी भर दिला आहे. दिवाळी सुटीचा आनंद लुटण्यास आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे ७० टक्क्यांहून अधिक पर्यटकांकडून बुिकंग झाले. कोरोना काळानंतर पर्यटन व्यवसाय बहरत असल्याने पर्यटन व्यावसायिकांना सुगीचे दिवस येतील, असे चित्र आहे.

kokan
T20 WC: टीम इंडियाचं नक्की काय चुकतंय? सचिनने दिलं उत्तर

कोरोनाच्या दीड-दोन वर्षांच्या काळात पर्यटन व्यवसाय पूर्णतः ठप्प राहिला. परिणामी पर्यटन व्यवसायातून होणारी कोट्यवधी रुपयांची उलाढाल थंडावली. स्कूबा, स्नॉर्कलिंगधारक, होडी व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिकांसह पर्यटनावर अवलंबून असलेल्या छोट्या व्यावसायिकांचा रोजगार हिरावला गेला. कामगारांचे पगार, वीज बिले, बँकांची थकलेली कर्जे यामुळे पर्यटन व्यावसायिक बेजार झाला. दागिने गहाण ठेवून कामगारांचे पगार, वीज बिले, बँकांच्या कर्जाची परतफेड करण्याची वेळ व्यावसायिकांवर आली. त्यामुळे कोरोनाची लाट ओसरेल व पुन्हा येथील पर्यटन बहरेल, अशी अपेक्षा पर्यटन व्यावसायिक बाळगून होते. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर शासनाने पर्यटन खुले केले; मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने देश, विदेशातून येणाऱ्या पर्यटकांनी येथील पर्यटनाकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. अनेक पर्यटकांनी आपली बुकींग रद्द केल्याने त्याचा मोठा फटका पर्यटन व्यावसायिकांना बसला. पर्यटकांनी पाठ फिरविल्याने पुन्हा व्यावसायिकांपुढील चिंता वाढली.

सप्टेंबरपासून किरकोळ पर्यटक येथे दाखल होत होते; मात्र वॉटरस्पोर्टस्, स्कूबा, स्नॉर्कलिंग, किल्ला प्रवाशी होडी वाहतूक सुविधा सुरू नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होत होता. गेल्या महिन्यात किल्ला प्रवाशी होडी वाहतुकीस तसेच वॉटरस्पोर्टना परवानगी मिळाल्यानंतर गोव्यासह अन्य भागातून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. पर्यटकांनी येथील किनारपट्टी बहरून गेली आहे. स्कूबा, स्नॉर्कलिंग, साहसी जलक्रीडा प्रकारांचा आनंद पर्यटकांकडून घेतला जात आहे. पर्यटकांच्या आगमनामुळे हॉटेल व्यवसाय तसेच पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेले व्यवसाय पुन्हा उभारी घेण्यास सज्ज झाले आहेत. अनेक पर्यटन व्यावसायिकांनी गेल्या दीड दोन वर्षांत झालेली तूट भरून काढण्यासाठी कंबर कसली आहे. पर्यटकांना चांगल्या सेवा, सुविधा देण्यावर त्यांनी भर दिला आहे. या हंगामात पर्यटकांचा ओघ असाच राहिल्यास पर्यटन व्यवसायातही तेजी राहील, अशी अपेक्षा पर्यटन व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

दिवाळी सुटीचा आनंद लुटण्यासाठी राज्यभरातून तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पर्यटकांनी आपली नोंदणी करून ठेवली आहे. साधारणतः २ नोव्हेंबरपासून मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे दाखल होणार आहेत. पर्यटकांची जास्त पसंती ही किनारपट्टी भागास असल्याने किनारपट्टी भागातील निवास न्याहरी, रिसॉर्ट धारकांनी चांगल्या सुविधा पर्यटकांना देण्यावर भर दिला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे ७० टक्क्यांहून अधिक पर्यटकांनी बुकींग केल्याची माहिती मिळाली आहे. येत्या काही दिवसात त्यात आणखी वाढही होईल. पर्यटकांसाठी मॅन्युअल तसेच ऑनलाईन बुकींग यांसारख्या सुविधा पर्यटन व्यावसायिकांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. याचबरोबर जे पर्यटन व्यावसायिक जस्ट डायल, बुकींग डॉटकॉमसह जे अन्य पोर्टलशी जोडले गेले आहेत. त्यांच्याकडून पर्यटकांचे चांगले बुकींग झाले आहे.

kokan
सरकारला लागोपाठ दुसरा झटका; अजित पवारांच्या मालमत्तेवर IT विभागाची कारवाई

खराब रस्ते, कचऱ्याचा प्रश्न

तारकर्ली, देवबाग हे पर्यटकांचे खास आकर्षण आहे. त्यामुळे येथे येणार्‍या पर्यटकांची संख्या जास्त आहे; मात्र सद्यस्थितीत या गावांकडे जाणार्‍या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी असलेले खड्डे, उडणारा धुरळा यामुळे पर्यटकांची गैरसोय होत आहे. पर्यटकांना येथील किनार्‍यांचे आकर्षण जास्त असल्याने मोठी गर्दी किनार्‍यावर असते; मात्र किनार्‍यावर असलेली अस्वच्छता पाहून त्यांच्यातून नाराजी व्यक्त होताना दिसते. या पार्श्‍वभूमीवर स्थानिक ग्रामपंचायतींनी कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावण्याबरोबरच जे कचरा करतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची भूमिका स्वीकारण्याची गरज आहे.

निवासाचे दर

निवास न्याहरी : होम स्टे एसी १८०० ते २००० रुपये, नॉन एसी १५०० ते १८०० रुपये

मोठी हॉटेल्स : एसी २३०० ते ३००० रुपये, नॉन एसी २००० रुपये

...तर पुन्हा सुगीचे दिवस

स्पर्धा वाढल्याने निवास, न्याहारी, होम स्टे, अन्य मोठ्या हॉटेल्सच्या दरांवर परिणाम होत आहेत. हल्ली ‘तुम्ही मासे आणून द्या, आम्ही बनवून देतो’ हा जो नवा ट्रेंड निर्माण झाला, तो घातक आहे. त्यामुळे तो बंद होण्याची गरज आहे. व्यावसायिकांनी स्वतः मासळी आणून ती पर्यटकांना बनवून दिल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. यादृष्टीने व्यावसायिकांनी प्रयत्न करायला हवेत. दिवाळी सुटी कालावधीसह पुढील पर्यटन हंगाम निश्‍चितच बहरेल. यातून पर्यटकांना पुन्हा सुगीचे दिवस दिसतील, अशी अपेक्षा बाळगून आहोत, असे पर्यटन व्यावसायिक मिठबांवकर यांनी सांगितले.

kokan
काय सांगता? पुण्यातील खड्डे बुजवणे झालं महाग!

पर्यटनाबाबत जिल्ह्याची स्थिती

  • बुकिंग कंपन्यांशी जोडलेल्या व्यावसायिकांची संख्या २५ टक्के

  • मॅन्युअल आणि ऑनलाईन बुकिंगची सुविधा

  • आतापर्यंत ७० टक्के पर्यटकांकडून बुकिंग

  • वाढत्या महागाईमुळे जेवणाच्या दरात १५ ते २० टक्क्यांची वाढ

  • खड्डे, अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या

  • पर्यटनदृष्ट्या समस्या सोडविण्याची होतेय मागणी

"कोरोनाची लाट ओसरल्याने पर्यटन खुले झाले. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढत आहे. दीड- दोन वर्षांत व्यावसायिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. मात्र, आता पर्यटन पुन्हा बहरत असल्याने याचा निश्‍चितच फायदा होईल. दिवाळी सुटीनिमित्त येणाऱ्‍यांचे २० नोव्हेंबरपर्यंत चांगले बुकिंग झाले आहे."

- मिथिलेश मिठबांवकर, पर्यटन व्यावसायिक, मालवण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com