esakal | Sindhudurga : सर्वसामान्यांची वीज तोडू नका
sakal

बोलून बातमी शोधा

KOKAN

सर्वसामान्यांची वीज तोडू नका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी : अगोदर ५० हजारांपेक्षा अधिक वीजबिलांची रक्कम थकीत असलेल्या धनदांडग्यांकडून वसुली करा, तोपर्यंत सर्वसामान्यांची वीज तोडू नका, असा इशारा पंचायत समितीचे सदस्य मंगेश लोके यांनी येथे ‘महावितरण’ला दिला.

येथील पंचायत समितीची मासिक सभा सभापती अक्षता डाफळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला उपसभापती अरविंद रावराणे, लक्ष्मण रावराणे, हर्षदा हरयाण, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब आदी उपस्थित होते. वीज बिल थकीत असलेल्या सामान्य ग्राहकांच्या वीज तोडणीवरून सदस्य लोके हे आजच्या सभेत आक्रमक झाले. गोरगरीब, सामान्य ग्राहकांची थकबाकी ५०० रुपयांपासून दीड-दोन हजारापंर्यंत आहे.

परंतु धनदांडग्यांची थकबाकीची रक्कम ही ५० हजारावर आहे. त्यामुळे अगोदर धनदांडग्यांवर कारवाई करा त्यानंतर सामान्यांकडुन वसुली करावी, अशी सूचना त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केली. यावेळी उपसभापती रावराणे यांनी देखील महावितरणच्या कारभारावर ताशेरे ओढले. महावितरणकडुन अनागोंदी कारभार सुरू आहे. चुकीची बिले दिली जातात त्याला जबाबदार कोण? असा प्रश्नही त्यांनी केला. महावितरणने सोमवार ऐवजी शनिवार किंवा रविवारी दुरूस्तीसाठी वीज पुरवठा बंद करावा. कार्यालयीन दिवशी वीज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे गैरसोय निर्माण होते, अशी सूचना गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी केली.

तालुक्यातील बहुतांश रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून, वाहने चालविणे मुश्‍कील झाले आहे. हा विषय आजच्या सभेत उपस्थित होणार असल्यामुळेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणचे अधिकारी सभेला अनुपस्थित राहिले असा आरोप उपसभापतींनी केला. उंबर्डे-वैभववाडी रस्त्याची दुरावस्था झाली असून या मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावे, अशी मागणी हर्षदा हरयाण यांनी केली.शहरातील जिल्हा परिषद शासकीय विश्रामगृहाची स्थिती स्मशानासारखी झाली आहे. ते तातडीने दुरुस्त करावे, अशी मागणी रावराणे यांनी केली असता इमारतीनजीक असलेल्या झाडांच्या फांद्या इमारतीच्या छप्परावर पडतात. त्यामुळे इमारतीचे नुकसान होते. ही झाडे तोडण्यासाठी झाडांचे मूल्यांकन वनविभागाकडुन करून घेण्यात आले आहे.

हेही वाचा: Guhagar : गुहागरमध्ये भाजपचा सत्तेतून काडीमोड

नगरपंचायतीकडून अद्याप ना हरकत मिळालेली नाही. ती मिळताच तोडणीचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. यावर रावराणे म्हणाले की शासकीय विश्रामगृहाची सातबारा दप्तरी किती जागा नोंद आहे आणि प्रत्यक्षात आता किती आहे हे तपासावे, जर अतिक्रमण असेल तर ते तातडीने हटवावे. तात्पुरत्या दुरूस्तीसाठी २५ हजारांची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगताच ती रक्कम पंचायत समिती स्तरावरून देण्यात येईल, असे गटविकास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. इंधनाला पैसे नसल्यामुळे पंचायत समितीची गाडी बंद आहे.

सभापती, अधिकाऱ्यांनी पाहणी दौरे कसे करायचे? असा मुद्दा रावराणेंनी उपस्थित करीत जिल्हा परिषदेकडे निधीची मागणी करावी, अशी सूचना केली. जलजीवन अभियानाच्या माध्यमातून गावागावांत पाण्याची कामे होत आहेत. पाणीपुरवठा हा जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना पाठीशी घालू नये, अशी सूचना गटविकास अधिकाऱ्यांनी केली. विकासकामांचे सर्व्हेक्षण असेल त्यावेळी खातेप्रमुखांनी हजर राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रुग्णवाहिका चालकाकडून भरपाई घ्या

आमदार नीतेश राणे यांनी दिलेली रुग्णवाहिका गेले दोन महिने आहे कुठे, असा प्रश्न अरविंद रावराणे यांनी उपस्थित केल्यावर या रुग्णवाहिकेचा अपघात झाल्याने नादुरुस्त असल्याचे आरोग्य विभागाकडून करण्यात सांगण्यात आले. हा अपघात घडविणाऱ्या चालकांकडून भरपाई करून घ्या, अशी सूचना रावराणे यांनी केली.

loading image
go to top