सात दिवस क्‍वारंटाईन धोकादायक : डॉक्‍टरांनी दिल्या या सूचना

शिवप्रसाद देसाई
Wednesday, 29 July 2020

डॉक्‍टर फॅर्टर्निटी क्‍लब : रुग्ण वाढल्यास आरोग्य यंत्रणा अपुरी

कणकवली (सिंधुदुर्ग) : सात दिवसांचे क्वारंटाईन ही पूर्ण अशास्त्रीय आणि अवैद्यकीय भूमिका आहे. डॉक्‍टर फॅर्टर्निटी क्‍लब या अर्धवट आणि अशास्त्रीय क्वारंटाईन कालावधीच्या पूर्ण विरोधात आहे. तसेच चाकरमान्यांच्या आगमनानंतर कोरोना रुग्ण वाढले तर त्यांच्यावर उपचारासाठीची यंत्रणा सिंधुदुर्गात अपुरी आहे. त्यामुळे कोकणवासीय आणि चाकरमान्यांनी मोठ्या जबाबदारीने आणि विचारपूर्वक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन सिंधुदुर्ग डॉक्‍टर फॅर्टर्निटी क्‍लबचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे आणि सचिव डॉ. सुहास पावसकर यांनी केले आहे.

पुढील महिन्यात गणेशोत्सव आणि सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणेची स्थिती या अनुषंगाने जिल्ह्यातील डॉक्‍टरांची संघटना असलेल्या डॉक्‍टर फॅर्टर्निटी क्‍लबची झूम मिटिंग झाली. यात डॉ. राजेंद्र पाताडे, डॉ. सुहास पावसकर यांच्यासह डॉ. राजेश्वर उबाळे, डॉ. संजीव आकेरकर, डॉ. गुरुराज कुलकर्णी, डॉ. राजेश नावांगुळ, डॉ. सुखानंद भागवत, डॉ. दर्शेश पेठे, डॉ. सतीश लिंगायत, डॉ. संदीप नाटेकर, डॉ. मिलिंद काळे, डॉ. राजेंद्र पारकर, डॉ. शरदचंद्र काळसेकर, डॉ. दीपक ठाकूर, डॉ. मयुर मुरकर आदी सहभागी झाले.

हेही वाचा- त्यामुळे आल्या सिंधुदुर्गातील या प्रसिध्द दोन नद्या चर्चेत.... -

या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. तसेच एक निश्‍चित भूमिका ठरविण्यात आली. मागील अनुभवानुसार कित्येक चाकरमान्यांचे कोरोना अहवाल हे ११ दिवसानंतर पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे १४ दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीत कोणतीही काटछाट ही धोकादायक आणि कम्युनिटी स्प्रेड करणारी ठरेल. त्याने कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राजकीय चढाओढ आणि मतांचे गणित न करता कोकणच्या भल्यासाठी जिल्हा प्रशासनाने निर्णय घ्यायचा आहे.

हेही वाचा- दहावीच्या निकालत यंदाही कोकण अव्वलच ; मुलींनी मारली बाजी... -

डॉक्‍टरांच्या काही सूचना
क्वारंटाईन व्यक्ती कोणती? हे कळण्यासाठी हातावर पूर्वी प्रमाणे शिक्का मारावा व शाईच्या ॲलर्जीची भीती असेल तर बोटांस निवडणुकीच्या धर्तीवर शाई लावली जावी. तसेच क्‍वारंटाईन व्यक्तींना कालावधीचे पत्र सोबत ठेवणे सक्तीचे करावे. एखादी व्यक्ती एखाद्या दवाखान्यात गेली असेल व नंतर पॉझिटिव्ह आली तर त्या डॉक्‍टरशी संपर्काचा कालावधी, संपर्काचा प्रकार व तीव्रता यावरच दवाखान्याचा क्‍वारंटाईन कालावधी ठरवावा. चाकरमान्यांनी बेफिकिरी दाखविल्यास कडक कारवाई करावी, असे डॉक्‍टरांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: doctor fertility club zoom meeting in kamkavli subject for 14 quarantine