दोडामार्ग सभापती अखेर शिवसेनेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

दोडामार्ग - येथील पंचायत समितीच्या सभापती संजना कोरगावकर यांनी अखेर हातात शिवबंधन बांधले. त्यांना सभापती बनवण्यात शिवसेनेची महत्त्वाची भूमिका होती. शिवसेनेत दाखल झाल्याने आता काँग्रेसचे बलाबल एकवरून शून्यावर तर शिवसेनेचे बलाबल तीनवरून चारवर पोचले आहे.

दोडामार्ग - येथील पंचायत समितीच्या सभापती संजना कोरगावकर यांनी अखेर हातात शिवबंधन बांधले. त्यांना सभापती बनवण्यात शिवसेनेची महत्त्वाची भूमिका होती. शिवसेनेत दाखल झाल्याने आता काँग्रेसचे बलाबल एकवरून शून्यावर तर शिवसेनेचे बलाबल तीनवरून चारवर पोचले आहे.

शिवसेनेने पंचायत समितीत काँग्रेसशी केलेली युती तोडावी; अन्यथा आम्ही खासदार विनायक राऊत यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका घेऊन भाजप पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. भाजपचे ते दबावतंत्र लक्षात घेऊन काँग्रेसच्या कोरगावकर यांना शिवसेनेत प्रवेश देऊन शिवसेनेने आपला एक सदस्य वाढवला आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मनोमिलनासाठी प्रवृत्त केले.

काँग्रेसच्या कोरगावकर यांनी सभापती झाल्यावर आपण स्वाभिमानच्या असल्याचे जाहीर करावे, यासाठी मोठा दबाव आणला गेला होता. वेंगुर्ले तालुकाध्यक्ष मनीष दळवी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांसह श्री. कोरगावकर यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. त्यानंतरही कोरगावकर आपल्या मतावर ठाम होत्या; मात्र आता कोरगावकर दाम्पत्याने शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून सगळ्याच वादांना पूर्णविराम दिला.

सौ. कोरगावकर, तालुका उपाध्यक्ष संदीप कोरगावकर यांनी खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी, संपर्कप्रमुख शैलेश परब, भाजप सरचिटणीस राजन तेली, संदेश पारकर, जिल्हा परिषद सदस्य संपदा देसाई, उपसभापती धनश्री गवस, संजय गवस, आनंद रेडकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेशप्रसाद गवस, गणपत देसाई, सज्जन धाऊसकर, रामदास मेस्त्री, भगवान गवस, उपजिल्हाप्रमुख अजित सावंत, राजन गावडे आदी उपस्थित होते.

दरम्यान, शिवसेना-भाजपमधील पेल्यातील ते वादळ आज शमले. शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आपले मनोमिलन झाले, आता यापुढच्या सगळ्या निवडणुका आम्ही एकीने लढवू, असा शब्द पत्रकार परिषदेतून दिला. येथील कल्पक हॉटेलमध्ये ही पत्रकार परिषद झाली. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी, संपर्कप्रमुख शैलेश परब, भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली, तालुकाध्यक्ष सुधीर दळवी उपस्थित होते.

भाजपला उपसभापतिपद
युतीचा गट स्थापन करूनही भाजपला सत्तेपासून दूर ठेवल्याने भाजपने शिवसेनेविरुद्ध याआधी दाखल केलेला दावा मागे घेण्याचा महत्त्वाचा निर्णय संयुक्त बैठकीत झाला. उपसभापतिपदही भाजपला देण्याचा निर्णय झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dodamarg Chairman finally enters in Shiv Sena