‘मोना’ने वाचविले शेतकऱ्याचे प्राण...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जून 2019

दोडामार्ग - मोर्ले येथे ज्येष्ठ नागरिक असलेल्या शेतकऱ्यावर हत्तीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांच्या मोना नावाच्या कुत्रीने मधे येत त्यांचे प्राण वाचविले. ही घटना काल (ता. ८) सायंकाळी साडेपाचला तेथील झरीजवळच्या वाघबीळ येथील काजूबागेत घडली.

दोडामार्ग - मोर्ले येथे ज्येष्ठ नागरिक असलेल्या शेतकऱ्यावर हत्तीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांच्या मोना नावाच्या कुत्रीने मधे येत त्यांचे प्राण वाचविले. ही घटना काल (ता. ८) सायंकाळी साडेपाचला तेथील झरीजवळच्या वाघबीळ येथील काजूबागेत घडली.

हत्ती हल्ल्यातून बचावलेल्या शेतकऱ्याचे नाव अनंत बाळा देसाई (वय ६५) असे आहे. ते दुपारी चार वाजता काजू बागेत काजू गोळा करण्यासाठी गेले होते. सोबत त्यांची मोना नावाचा कुत्रा होता. एका फणसाच्या झाडाखाली भलामोठा हत्ती फणस खात होता. देसाई यांना पाहताच तो त्यांच्या अंगावर धाऊन आला. त्यांनी त्याच्यापासून वाचण्यासाठी गोल गोल धावायला सुरवात केली.

मोनाने हत्तीच्या अंगावर ओरडत त्याला परावृत करण्याचा प्रयत्न केला, तेवढ्यातच हत्ती त्यांच्या अगदी जवळ पोचला. तो सोंडेने त्यांना पकडणार हे लक्षात येताच त्यांनी जीवाच्या आकांताने ओरड मारली. त्या आवाजाबरोबर मोना हत्ती आणि तिचा मालक यांच्यामध्ये आली आणि तिने हत्तीची सोंड पकडण्याचा प्रयत्न केला. हत्तीने मग आपला मोर्चा तिच्याकडे वळवला.

हत्ती तिच्या मागे गेला आणि देसाई यांचे प्राण वाचले, तर मोनाने मालक दूर गेल्याचे पाहून मालकाला गाठले आणि दोघे घरी पोचले. त्यांच्या आवाजाने त्यांच्या जवळच्या काजू बागेत काम करणारे त्यांचे भाऊ गणपत देसाई सावध झाले. त्यांनीही प्रसंग लक्षात घेऊन आरडाओरड केली.

हत्तीने दोघांच्या बागेतील फणस तोडून टाकले आणि खाल्ले होते तसेच अनेक काजू कलमेही उखडून टाकली. त्यानंतर रात्री गावकऱ्यांनी वनकर्मचाऱ्यांना सोबत घेऊन त्या परिसराची पाहणी केली तेव्हा त्यांनाही हत्ती दिसला. त्याचा डेरा पुरणीत होता.तेथे त्याने विष्ठा आणि विश्रांती केल्याचे दिसत होते. त्या परिसरातील जंगल भागात पाणीच नसल्याने तो हत्ती देसाई यांच्या बागेजवळच्या झरीवर पाणी पिण्यासाठी येतात. फणस, पाणी आणि बांबू त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर असल्याने हत्तींचा तेथे सतत वावर आढळतो आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dog named Mona saves farmers life