थेट अ‍ॅमेझॉन वरून १ हजार डझन आंबा खरेदी; २० शेतकऱ्यांची चांदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Alphonso Mango

थेट अ‍ॅमेझॉन वरून १ हजार डझन आंबा खरेदी; २० शेतकऱ्यांची चांदी

रत्नागिरी : ऑनलाईन मार्केटींग करणाऱ्‍या कंपन्या हापूस खरेदीसाठी थेट बागायतदारांच्या शिवारात दाखल झाल्या आहेत. यंदापासून जागेवर खरेदीसाठी प्रथमच रत्नागिरीत आलेल्या अ‍ॅमेझॉन कंपनीकडून १ हजार डझन आंबा वीस शेतकऱ्‍यांकडून खरेदी केला असून १८५ ते २२० ग्रॅमच्या फळाला ८०० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. परिणामी विक्रेत्यांकडून सरासरी दरात समाधान मानणाऱ्‍या शेतकऱ्‍याला आता स्वतः दर ठरवण्याची संधी मिळणार आहे.

कोकणातील हापूसची चव चाखण्यासाठी देशातीलच नव्हे तर परदेशातून मोठी मागणी आहे. यंदा उत्पादन कमी असल्यामुळे बाजारातील आवक घटली आहे. रत्नागिरी, देवगडचा हापूसमध्ये भेसळ करुन विक्री होत असल्याने अनेकांना खऱ्‍या हापूसची चवच कळत नाही.

त्यासाठी भौगोलिक मानांकन प्राप्त झाल्यानंतर पणन, कृषी विभागाकडून पावले उचण्यात आली आहे. त्याला ऑनलाईन कंपन्यांचीही जोड मिळू शकते. चार वर्षांपूर्वी बिगबास्केट या कंपनीने रत्नागिरीत थेट बागायतदारांकडून आंबा खरेदीला सुरवात केली होती. त्याचा फायदा बागायतदारांना झाला. त्यानंतर किशान कनेक्ट, टाटा फश सारख्या कंपन्याही उतरल्या आहेत. त्यात अ‍ॅमेझॉन कंपनीची भर पडली आहे. काही बागायतदार स्वतः ऑनलाईन विक्री करत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

रत्नागिरीतील मिरजोळे येथे अ‍ॅमेझॉन मार्फत संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत १ हजार डझन हापूस शेतकऱ्‍यांकडून खरेदी करण्यात आला आहे. खरेदीनंतर चार तासात पैसे बागायतदारांच्या बँक खात्यात जमा केले जातात. वाहतूकीचा खर्च टाळण्यासाठी अ‍ॅमेझॉन कंपनीचे प्रतिनिधी प्रत्यक्ष बागायतदारांच्या पॅकहाऊसमध्ये जाऊन पॅकिंग करत आहेत.

त्यामुळे बागायतदाराचा वाहतूक खर्च कमी झाला आहे. सध्या १८५ ते २२० ग्रॅमपर्यंतचे पिकलेले फळ खरेदी केले जात आहे. रत्नागिरीतील शेतकऱ्‍यांना याचा फायदा मिळत असून जागेवर दर्जेदार आंबा खरेदी होत असल्यामुळे समाधान व्यक्त केला जात आहे.

एक नजर.

  • १८५ ते २२० ग्रॅमच्या फळाला दर : ८०० रुपयांपर्यंत

  • सध्या पिकलेले फळ खरेदी केले जाते : १८५ ते २२० ग्रॅमपर्यंत

  • आतापर्यंत शेतकऱ्‍यांकडून खरेदीः १००० डझन हापूस

एक दृष्टिक्षेप..

  • शेतकऱ्‍यांच्या पॅकहाऊसमध्ये हापूसचे पॅकिंग

  • बागायतदारांचा वाहतूक खर्च वाचतो

  • शेतकऱ्‍यांकडून दर्जेदार फळाची निवड

  • चार तासाच्या आत पेमेंट

  • विशिष्ट ग्रेडचा आंबा विकला, तर..

मुंबईतील वाशी बाजारात मोठ्याप्रमाणात हापूस विकला जातो. तेथील दलाल सरसकट माल खरेदी करताना सरासरी दर देतात. विशिष्ट ग्रेडचा आंबा विकला तर चांगला दर मिळू शकते, हे ऑनलाईन कंपन्यांमुळे बागायतदारांच्या लक्षात आले आहे.

Web Title: Dozens Mangoe Directly Amazon Farmer Silver

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top