रत्नागिरीत कोरोना समूह संसर्गाचा धोका ? डॉ. अभय धुळप

मकरंद पटवर्धन
Monday, 17 August 2020

रत्नागिरी तालुक्यात सध्या 650 क्वारंटाइन बेड्स असून ते कोरोना केअर सेंटर्ससाठी अपुरे आहेत

रत्नागिरी : रत्नागिरीत आता कोरोना समूह संसर्ग (कम्युनिटी स्प्रेड) झाल्यासारखी भीती आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणे, पूर्णवेळ फिजिशिअन्स उपलब्ध करणे अत्यावश्यक आहे.  हाय नेसल फ्लो मशिन गंभीर रुग्णांसाठी आवश्यक असून सुमारे 20 मशीनची खरेदी केली पाहिजे. किमान 2 ते 3 इच्छुक खासगी रुग्णालयांना शासनाने मान्यता द्यावी. मोठ्या प्रमाणात स्क्रिनींग तत्काळ करावे, अशी मागणी भाजपा वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभय धुळप यांनी केली आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेऊन हे निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे, जिल्ह्यात 20 लाख लोकसंख्येला आवश्यक कोरोना केअर सेंटर्स चालू केली पाहिजेत. रत्नागिरी तालुक्यात सध्या 650 क्वारंटाइन बेड्स असून ते कोरोना केअर सेंटर्ससाठी अपुरे आहेत. रत्नागिरीत तुटपुंजे मनुष्यबळ व अपुर्‍या साधनसामुग्रीमुळे दोन आठवडे कित्येक रुग्ण शहराबाहेर धाव घेत आहेत.

हेही वाचा - पारंपरिक मत्स्य व्यावसायिक महिलांचे शासनाला साकडे...

जिल्ह्या जवळचे चांगल्या वैद्यकीय सुविधा असणारे शहर कोल्हापूर येथे रुग्णांना बेड मिळताना अडचणी येत असल्याने जिल्हा रुग्णालयच सुविधा मिळायला हव्यात. शासकीय रुग्णालयातील पूर्णवेळ फिजिशिअन डॉ. प्रकाश जांभुळकर पुन्हा सेवेत रुजू झाले आहेत. मात्र त्यांच्यावरील भार हलका करण्यासाठी किमान चार पूर्णवेळ फिजिशिअन्स रुग्णालयात असावेत. हाय नेसल फ्लो मशिनअभावी चार महिन्यांपासून रुग्णालयात मृत्यू होत आहेत.

फॅमिली फिजिशिअन्सची मदत घ्यावी

लक्षणे नसणारे किंवा सौम्य लक्षणे असणारे रुग्णांना त्यांच्या फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याने प्रशासनाकडे नोंद करुन उपचार घेण्यास प्रशासनाने उद्युक्त करावेत. शहरातील सर्व फिजिशिअन्स दवाखाने चालू ठेवत आहेत. मेडीकल कौन्सिलकडून प्रशिक्षण घेत प्रशासनास सहकार्य करीत आहेत. अशांना कोरानालढाईत सहभागी करुन घेता येईल. कोरोनाच्या प्रारंभानंतर साधारणपणे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा ग्रीन झोनकडे वाटचाल करत होता. परंतु सुमारे तीन आठवडे आढळणारे बहुसंख्य रुग्ण मुंबईतून दाखल झालेले होते. गेल्या सुमारे दीड महिन्यापासून स्थानिक संक्रमण सुरू झाले आहे. त्यामुळेच या सूचना, मागण्या केल्याची माहिती डॉ. धुळप यांनी दिली.

हेही वाचा -  कोकणात तीन दिवसांत या नद्यांनी गाठली धोक्याची पातळी...

रॅपिड टेस्ट करा

समूह संसर्ग रोखण्यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांच्या सहकार्याने रॅपिड अँटीजेन किटचा वापर करुन पोलीस, शासकीय कर्मचारी, बँक कर्मचारी, व्यापारी, भाजीवाले, दुकानदार तसेच सर्व वैद्यकीय व्यावसायिक व कोविड सेंटर्सचे कर्मचार्‍यांची तपासणी करावी. तसेच शहरातील ज्या भागात जास्त रुग्ण सापडत आहेत तेथेही तत्काळ तपासणी  करावी.

संपादन -  स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr. abhay dhulap says fear of community spread corona in ratnagiri