या शेतकऱ्यांचा सुटला 'हा' प्रश्‍न कायमस्वरुपी..

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आणि सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी ही यो़जना महत्वाची..

रत्नागिरी :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, २०१९-२० या वर्षात ११२ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यातील पात्र ठरलेल्या ९५ लाभार्थ्यांपैकी ६६ जणांना विहिरींची कामे सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्यासाठी पावणेदाने कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. तीन वर्षांत २१९ शेतकऱ्यांना विहिरी मिळणार आहेत.

जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आणि सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेत नवीन विहिरीला २.५० लाख, जुनी विहीर दुरुस्ती ५० हजार रुपये मिळतात. लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे. लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाखाच्या मर्यादेत आणि जमीनधारणा ०.२० हेक्‍टर ते ६ हेक्‍टरपर्यंत आवश्‍यक आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

हेही वाचा- परदेशी पाहुण्यांनी दिली भारतीयांना ही सेवा...

तीन वर्षांत २१९ शेतकऱ्यांना विहिरी मिळणार 

२०१७-१८ या वर्षात १३३ चे लक्षांक नवीन विहिरीसाठी दिले होते. त्यापैकी ९० प्रस्तावांना कार्यारंभ आदेश मिळाले असून ८२ कामे सुरू आहेत. त्यातील ७८ पूर्ण झाली असून चार अपूर्ण आहेत. आठ कामे रद्द करण्यात आली.या योजनेसाठी २०१८-१९ या वर्षात ८५ चा लक्षांक दिला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून ८५ प्रस्तावांना मान्यता मिळाली. ७५ कामे सुरू झाली असून ४२ पूर्ण झाली तर २० अपूर्ण आहेत. कामे सुरू न केलेल्या विहिरींची संख्या ९, तर आठ कामे रद्द केली आहेत. 

हेही वाचा- वैद्यकीय महाविद्यालयाचा शब्द सीएम पाळतील का ?

६६ कामांना कार्यारंभ आदेश
२०१९-२० या वर्षात ११२ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. छाननीमध्ये ९६ प्रस्ताव पात्र ठरले असून ६६ कामांना कार्यारंभ 
आदेश मिळाले आहेत. त्यासाठी १ कोटी ७१ लाख ६० हजार रुपयांचा निधी लागणार आहे. सध्या १२ लाख ४० हजार रुपयांचा निधी तालुक्‍यांकडे शिल्लक आहे. योजनेचा फायदा ग्रामीण भागातील लोकांना झाला असून उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नसल्याने त्यांचा  पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी सुटला आहे. याबाबत लाभार्थी समाधानी आहेत.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr. babasaheb ambedkar agriculture self-reliance success scheme in ratnagiri kokan marathi news