डॉ. बोल्डे यांच्याकडे पदभार न दिल्यास राजीनामा सत्र ; मॅग्मो संघटनेचा इशारा 

राजेश शेळके
Wednesday, 30 September 2020

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांना कार्यभार न दिल्यास जिल्ह्यात राजीनामा सत्र सुरू होईल.

रत्नागिरी : यवतमाळप्रमाणेच जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा वेठीला धरली जात आहे. यवतमाळ जिल्ह्यात ‘जिल्हाधिकारी हटाव’ या मोहिमेंतर्गत 120 वैद्यकीय अधिकार्‍यांनी राजीनामा दिला. अशीच परिस्थिती जिल्ह्यात निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांना कार्यभार न दिल्यास जिल्ह्यात राजीनामा सत्र सुरू होईल. याला जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा मॅग्मोचे जिल्हाध्यक्ष डॉ. भगवान पितळे यांनी दिला. 

रत्नागिरीत आज जिल्हा मॅग्मो संघटनेची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते. ते म्हणाले, आमची सहनशक्ती आता संपली आहे. जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सरंजामशाहीचा बळी ठरू लागली आहे. यवतमाळमध्ये जिल्हाधिकार्‍यांनी डॉक्टरांना दिलेल्या वागणुकीवरून तब्बल 120 डॉक्टरांनी राजीनामा देऊन चक्क जिल्हाधिकार्‍यांविरोधात एल्गार पुकारला आहे. त्याला राज्य मॅग्मो संघटनेने पाठिंबा दिला. यवतमाळमध्ये डॉक्टरांचे आंदोलन सुरू असून यवतमाळप्रमाणेच रत्नागिरीतदेखील असाच प्रकार सुरू आहे. गेले सात महिने कोरोनाकाळात अपुर्‍या कर्मचार्‍यांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात केवळ 5 अधिकारी हे क्लास वन अधिकारी आहेत. मात्र फिजिशियनसह अन्य विभागातील डॉक्टरांची वानवा आहे. जिल्हा रुग्णालयाची अवस्था फार भयावह आहे. जिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी फिजिशियन नाहीत. दापोलीतील उसने फिजिशियनवर जिल्हा रुग्णालयाचे कामकाज चालू आहे. 

जिल्ह्यातही डॉक्टर राजकीय बळी ठरू लागले आहेत. या राजकीय हस्तक्षेपामुळे दरदिवशी डॉक्टरांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हा हस्तक्षेप थांबण्याची गरज आहे. सिव्हिल सर्जनसह महिला आरोग्य अधिकार्‍यांना रात्री 11 वाजता फोन करून हिशेब विचारला जातो. ही पद्धत योग्य नाही. या लॉबीविरोधात आमचा लढा आहे. अधिकारांवरच घाला घालण्याचा प्रयत्न झाल्यास जिल्ह्यातही संपाशिवाय पर्याय नाही. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे हे याविरोधात लढले. त्यामुळेच त्यांचा बळी गेला; मात्र आता आमची राज्य मॅग्मो संघटनेसोबत चर्चा सुरू आहे. बोल्डे यांना कार्यभार न दिल्यास राजीनामा सत्र सुरू होईल, असा इशारा अध्यक्ष डॉ. पितळे यांनी दिला.

हे पण वाचा कृषी आणि कामगार कायद्या विरोधात उभे राहा : पालकमंत्री सतेज पाटील

 

आरटीपीसीआर लॅबला तांत्रिक मान्यताच नाही

जिल्ह्यात लॉकडाउनच्या काळात अवघ्या 14 दिवसात आरटीपीसीआर लॅब इन्स्टॉल करण्यात आली; मात्र त्या लॅबला अद्याप तांत्रिक मान्यताच मिळालेली नाही. याचे कारण काय? असा सवालही डॉ. पितळे यांनी उपस्थित केला.

 संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Bolde is not appointed if Resignation session Magmo organization warning