लोटे प्रकरणातील फरारी आरोपीबरोबर नको म्हणून प्रचारापासून दूर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

गुहागर - आजपर्यंतच्या राजकीय जीवनात काही पथ्ये मी पाळत आलो आहे. कोणत्याही निवडणुकीत मी खोटे आश्वासन दिले नाही. कायद्याला बगल देऊन वागलो नाही. हे पथ्य काटकोरपणे पाळत असल्याने फरार आरोपीबरोबर बसता येत नाही. त्यामुळे प्रचारात सामील होत नाही, असे बोचरे प्रतिपादन डॉ. विनय नातू यांनी केले. 

गुहागर - आजपर्यंतच्या राजकीय जीवनात काही पथ्ये मी पाळत आलो आहे. कोणत्याही निवडणुकीत मी खोटे आश्वासन दिले नाही. कायद्याला बगल देऊन वागलो नाही. हे पथ्य काटकोरपणे पाळत असल्याने लोटे प्रकरणातील फरार आरोपीबरोबर बसता येत नाही. त्यामुळे प्रचारात सामील होत नाही, असे बोचरे प्रतिपादन डॉ. विनय नातू यांनी केले. 

भाजप वर्धापनदिनानिमित्त डॉ. नातू गुहागरला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आपण निर्देश केलेल्या फरारी आरोपीला भाजपची सत्ता असली तरी पोलिस अटक का करत नाहीत, असे विचारता याचे उत्तर पोलिसांनाच विचारावे लागेल, असे त्यांनी सांगितले. दापोली आणि गुहागर विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट नाही. या संदर्भातील निर्णय वरिष्ठांकडे सोपविला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

गुहागर, खेड, मंडणगड व दापोलीतील कार्यकर्त्यांना शिवसेनेकडून सन्मानाची वागणूक मिळत नाही. त्यामुळे निवडणुकीत काम कसे करायचे याबाबत पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे. तो कसा दूर करणार,या प्रश्नाला उत्तर देताना नातू म्हणाले काही दिवसांपूर्वी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी रवींद्र चव्हाण यांनी दौरा केला. सुरवातीला उत्तर रत्नागिरी जिल्ह्याची एकत्र मीटिंग ठरली होती. मात्र, रत्नागिरी आणि रायगड लोकसभा मतदारसंघातील बैठका स्वतंत्र घ्याव्यात असा आग्रह आम्ही धरला. त्याप्रमाणे गुहागर आणि दापोली विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक लोटे येथे झाली.

त्यावेळी सर्वच कार्यकर्त्यांनी आपले म्हणणे चव्हाणांसमोर स्पष्ट केले. हा विषय वरिष्ठ नेर्त्यांपर्यंत पोचला आहे. तेथून येणाऱ्या उत्तराची प्रतीक्षा आहे. तरीही फीर एक बार मोदी सरकार या घोषणेसाठी भाजप कार्यकर्ते काम करत आहेत. गीतेंच्या विजयाबाबत बोलताना नातूंनी गूढ उत्तर दिले. ते म्हणाले की, २०१४ मध्ये पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या कामामुळेच गीते निवडून आले. तसेच २०१९ मध्येही घडेल. 

मंत्री अडचणीत यायला नकोत 
राज्यात युतीचे सरकार आहे. गृहमंत्री भाजपचे तर गृहराज्यमंत्री शिवसेनेचे आहेत. अशावेळी फरार आरोपीसोबत बसण्याने माझे मंत्री अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे एकाच व्यासपीठावर जाण्याचे टाळतो आहे, असे नातू यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr Vinay Natu comment