सी व्ह्यू गॅलरी यांच्यामुळे पडल्या ; डॉ. विनय नातू यांची टीका

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 22 August 2020

‘हम करे सो कायदा’ म्हणत अनधिकृत बांधकामांसाठी कोणी कोणाचे खांदे वापरले, तेही समोर आले आहे.

गुहागर : अनधिकृत बांधकामांसाठी वापरलेला पैसा वसूल झाल्यानंतर गुहागर नगरपंचायतीकडे पर्यटन विकासासाठी वर्ग करावा, अशी मागणी माजी आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी केली. त्याचवेळी ‘हम करे सो कायदा’ म्हणत अनधिकृत बांधकामांसाठी कोणी कोणाचे खांदे वापरले, तेही समोर आले आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरील तिन्ही सी व्ह्यू गॅलरी पाडल्याप्रकरणी माध्यमांमध्ये भाजप आणि डॉ. नातूंवर टीका सुरू होती. या संदर्भात डॉ. नातूंनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, ही सी व्ह्यू गॅलरी न्यायालयाच्या निकालामुळे पाडावी लागली आहे. अनधिकृत बांधकाम सुरू असताना मी स्वत: गुहागर पोलिस ठाण्यात पत्र दिले होते; मात्र आम्ही चौकशी केली असता, हे बांधकाम संबंधित विभागांची परवानगी घेऊन केले आहे, असे त्या वेळी पोलिसांनी सांगितले. त्याची नोंद पोलिस ठाण्यात सापडेल. त्या वेळी जरी प्रक्रिया पूर्ण केली असती, तर ही वेळ आली नसती.

हेही वाचा - तुम्हाला कोरोना होऊन गेला आहे की नाही हे जाणून घ्यायचे आहे ? मग ही बातमी वाचाच..

लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या ‘हम करे सो कायदा’ या वृत्तीमुळे सी व्ह्यू गॅलरी पडल्या आहेत. ज्यांचे खांदे वापरले गेले आणि ज्यांनी ते खांदे वापरले, त्यांना हरित लवादाच्या आदेशातून योग्य उत्तर मिळाले आहे. हा विषय सुरू असताना क्रीडा संकुलवरही काहींनी भाष्य केले. यामुळे जनतेचा पैसा कुठे वाया गेला, याची माहिती सर्वांना मिळाली आहे, असे प्रत्युत्तर डॉ. नातूंनी दिले. 

वसुलीची रक्‍कम न. पं. कडे वर्ग करा

न्यायालयाने दिलेला निर्णय मान्य आहे. या अनधिकृत बांधकामाचा पैसा संबंधितांकडून वसूल करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. हा निधी शासनाने पर्यटन विकासासाठी दिला होता. त्यामुळे वसूल होणारे पैसे गुहागर नगरपंचायतकडे वर्ग करावेत. हा निधी नगरपंचायतीने पर्यटन विकासासाठी वापरावा, अशी मागणीही या वेळी डॉ. नातूंनी केली.

हेही वाचा - आता मोबाईल वापरा जरा जपुनच ! 

कार्यक्षेत्र सीआरझेड दोनमध्ये वर्ग करावे 

गुहागर नगरपंचायत असल्याने हे कार्यक्षेत्र सीआरझेड दोनमध्ये वर्ग करावे, अशी मागणी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

संपादन - स्नेहल कदम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dr vinay natu criticised on the topic of see view gallery in ratnagiri