जिन्नस नकोय, पाणी हवय, पाणी..; चिपळुणातील गृहिणी हताश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिन्नस नकोय, पाणी हवय, पाणी..; चिपळुणातील गृहिणी हताश

जिन्नस नकोय, पाणी हवय, पाणी..; चिपळुणातील गृहिणी हताश

चिपळूण : शहराची स्थिती अत्यंत विदारक झाली आहे. ५ दिवस पूर्ण हताश अवस्थेत गेले. फोनला रेंज आणि लाईटसुद्धा विलंबाने आलेत. अतिशय कठीण अवस्था आहे. माझ्या इथेसुद्धा पाच दिवस लाईट नाही, पिण्याचे पाणी नाही, पावसाचे पाणी जमवून दिवस काढलेत. फोन चालू नसल्यामुळे कुणाला कळवणार कसं? समोर पाण्याच्या गाड्या दिसल्या की धावपळ करून काय मिळेल, तेवढं पाणी आणायचे.

बिल्डिंगमधले दुकानदार साफसफाई करायला आले. त्यांनी मागे पऱ्यातले पाणी पंपाने घेऊन दुकाने साफ केलीत. पण त्यांना चहा-नाश्ता करायलातरी पाणी हवं ना. बाकी काही मदत नकोय, पण पिण्याचे पाणी खूप गरजेचं होत, अशी प्रतिक्रिया चिंचनाका येथील सुप्रिया गुरव यांनी जाहीरपणे मांडली.

हेही वाचा: 'पूरस्थिती लक्षात घेऊन समुद्र किनारी बांधणार संरक्षण भिंत'

सुप्रिया गुरव यांनी नागरिक या काळातही वेगळा विचार करतात, याबद्दल खंत व्यक्त केली. सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहणारे मदत घेताहेत. यांना लाजा नाही का वाटत? मला हे वाचून खूप वाईट वाटले. काय म्हणून तुम्ही असं म्हणू शकता? आज ग्राउंड, फर्स्ट फ्लोअरचे रहिवाशी दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांकडे राहिले आहेत. खाली दुकानात माल उचलायला आलेली ३०, ४० माणसे दुसऱ्या मजल्यावर दोन दिवस होती. त्यांना चहा-नाश्ता, जेवण, कुणी दिल? माझ्या इथे चार दिवसात कोणी फिरकलं नाही. ती माणसं आमच्याकडे सुरक्षित राहिलीत म्हणून देवाचे आभार मानतो. पण, ज्या बिल्डिंगमध्ये पाच दिवस लाईट नाही, त्या लोकांची काय अवस्था झाली असेल, ते फक्त त्या माणसालाच माहित.

चिंचनाका मेन मार्केटमध्ये मदत नाही..

मी चिंचनाकासारख्या मेन मार्केटमध्ये राहते, पण काही मदत आलेली नाही. पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः धावपळ करावी लागत होती. इतक्या माणसांना पाणीतरी कुठून आणणार? आज सगळ्यांनाच मदतीची गरज आहे. जिन्नस नकोय, पाणी हवं आहे. ते कृपया सगळ्या बिल्डिंगमध्ये पुरवठा करा. स्वच्छ पाण्याची व्यवस्था व्हायला हवी आहे आणि मार्केट पूर्ण पाण्यात गेल्यामुळे ज्या लोकांना जिन्नससुद्धा गरजेचं आहे. मग ती कुठल्याही मजल्यावर राहात असुदेत. त्यातसुद्धा कुणी गरजू असू शकतो, याचा सगळ्यांनी विचार करायला हवा, अशा शब्दांत त्यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली.

हेही वाचा: जगातील सगळ्यात स्वस्त डिजिटल कार; जबरदस्त परफॉर्मन्स अन्

कॉइन टाकले की पाणी, लाईट येत नाही

अजूनतरी चिपळूणमध्ये कुठल्याही नळ कनेक्क्षण आणि लाईट मीटरला पैशाची नोट दाखवली किंवा कॉइन टाकला की पाणी, लाईट येण्याची सिस्टीम नाही. चिपळूणमधल्या प्रत्येक माणसाचं घर, कुणाचं दुकान याचं नुकसान झालं आहे, त्यामुळे येणाऱी मदत सगळ्यांना मिळाली पाहिजे, अशी मागणी करण्यात येत आहे.

loading image
go to top