शेतकऱ्यांच्या हाती केवळ कणी अन्‌ पिवळा तांदूळच

राजेश कळंबटे
Monday, 19 October 2020

हेक्‍टरी उत्पादनात १५ टक्‍के घट होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्‍त केलाय.

रत्नागिरी : ऑक्‍टोबर महिन्यात प्रथमच पडलेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीवरील अस्मानी संकटात भातं वाहून गेली, आडव्या भाताला मोड आले. भात पावसात भिजल्याने मिळणाऱ्या तांदळाचा दर्जा घसरणार आहे. भात भरडल्यावर कणी, पिवळा तांदूळ हाती लागेल. तसेच गुरांना खाण्यायोग्य पेंढाही राहील की नाही, अशी शंका आहे. हेक्‍टरी उत्पादनात १५ टक्‍के घट होईल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्‍त केलाय.

जिल्ह्यात यंदा ६८ हजार हेक्‍टरवर भात तर ९ हजार हेक्‍टरवर नाचणीची लागवड झाली. शेतीला पूरक वातावरणामुळे हाती चांगले पीक येईल, असा अंदाज होता. कीडरोगाचाही प्रादुर्भाव नियंत्रणात होता; मात्र ऑक्‍टोबरच्या सुरवातीलाच पावसाचे ग्रहण लागले. १० ऑक्‍टोबरपासून त्याने धुमाकूळच घातला. हळव्याची ६० टक्‍के तर गरव्याची ३० टक्‍के कापणी यामुळे रखडली.

हेही वाचा - शिकारीस चाललेल्या सात तरुणांना अटक, तिघे फरार -

अर्जुना, कोदवली, मुचकुंदी, काजळी, बावनदी, शास्त्री या नद्यांच्या किनाऱ्यावरील शेतीत पुराचे पाणी घुसले. जिल्ह्यात सुमारे ६ हजार हेक्‍टरवरील भातशेतीचे नुकसान होईल, असा अंदाज आहे. सर्वाधिक नुकसान आडव्या झालेल्या भातावर पडलेल्या पावसाने पुन्हा कोंब आल्याने झाले. भात पावसात पुन्हा रुजले आहे. अनेक शेतकऱ्यांनी हाती लागेल ते पदरात पाडून घेण्यासाठी ओलं भात झोडायला सुरवात केली.

४८ तासापेक्षा अधिक काळ भात पाण्यात पडून राहिल्याने लोंबीचे दाणे कुजून जातील. स्थानिक भाषेत चिंब झाले, असे म्हणतात.
ज्या ठिकाणी भात पडले नाही, तेथे अख्खा तांदूळ नाही तरी कणी मिळेल, अशी आशा आहे. तांदूळ काळा, पिवळा पडण्याची शक्‍यता असून त्याला वासही येऊ शकतो. त्यामुळे त्याची विक्री करणेही अशक्‍य आहे. जिल्ह्याचे सरासरी हेक्‍टरी उत्पादन हे ४० ते ४५ क्‍विंटल आहे. त्या उत्पादनात मोठी घट अपेक्षित असून १५ क्‍विंटल भात उत्पादन घटेल, अशी भीती व्यक्‍त होत आहे.

हेही वाचा - परशुराम भूमीतील श्री भवानी वाघजाई मातेचा इतिहास तुळजापुरच्या भवानीशी

"पावसामुळे अनेक ठिकाणी भात रुजले. पाऊस थांबल्याने कापणी सुरू झाली. तो थांबला नसता तर हाती काहीच लागले नसते. पाण्यात राहिलेल्या भाताच्या दर्जावर परिणाम होणार आहे. भात भिजले तरीही भात वाळवून झोडले पाहिजे."

- डॉ. भरत वाघमोडे, भात संशोधक, शिरगाव

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to heavy rain and cyclone damage the crop of rice in ratnagiri 15 percent damage the crop of farmers

Tags
टॉपिकस
Topic Tags: