रत्नागिरीत अतिक्रमण, शिकारी वाढल्यामुळे बिबट्यांचा अधिवास धोक्‍यात

राजेश शेळके
Sunday, 22 November 2020

जिल्ह्याचे शासकीय वनक्षेत्र अवघे १ टक्के उर्वरित खासगी क्षेत्र आहे. फार्महाउस बांधून बिबट्यांच्या अधिवासात माणूस शिरला.

रत्नागिरी : शहरालगतच्या गावांमध्ये बिबट्यांचे वाढते हल्ले सर्वांनाच विचार करायला लावणारे आहेत. जिल्ह्याचे शासकीय वनक्षेत्र अवघे १ टक्के उर्वरित खासगी क्षेत्र आहे. फार्महाउस बांधून बिबट्यांच्या अधिवासात माणूस शिरला. माणसाने काहीही खायचे ठरविल्यामुळे शिकारीचे प्रमाण वाढल्याने बिबट्याशी स्पर्धा सुरू आहे. बिबट्यांची संख्या वाढली असल्याने सहज शिकार मिळविण्यासाठी बिबट्या शहर आणि गावांमध्ये शिरू लागला, असे मत रत्नागिरीतील सेवानिवृत्त वनाधिकारी एम. एम. साबळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.  

बिबट्याने हातखंबा येथील मुन्ना देसाई यांचा कुत्रा ठार केला. दोन दिवसांपूर्वी पाली येथील एक वासरू आणि मिरजोळे येथील एक अशी दोन वासरे बिबट्याने ठार केली. पावस पंचक्रोशीत बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. जनावरांबरोबर, दुचाकीस्वारांवर हल्ले झाल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. येथील एका बिबट्याला पकडण्यास वनविभागाला यश आले; मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा जनावरांवर हल्ला झाला. त्यामुळे हल्लेखोर बिबट्या जेरबंद झाला की दुसरा हे वनविभागाकडून स्पष्ट झालेले नाही. याबाबत वनविभागाचे सेवनिवृत्त अधिकारी साबळे यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, बिबट्यांचा अधिवास सध्या धोक्‍यात आहे.

हेही वाचा - वैद्यकीय अधिकाऱ्यांना कणकवलीत घेराओ
 

प्रत्येक बिबट्याने आपली एक हद्द करून ठेवलेली असते. त्यामध्ये तो दुसऱ्या बिबट्याला घुसखोरी करू देत नाही; मात्र जंगलांचा होणारा ऱ्हास, फार्महाउसेस यामुळे आपण थेट बिबट्याच्या घरात शिरलो आहोत. कर्मचाऱ्यांना दोष देण्यात अर्थ नाही जिल्ह्याच्या वनक्षेत्राला अनुसरून शासन अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करते. जिल्ह्यात फक्त १ टक्के शासकीय वनक्षेत्र, उर्वरित खासगी आहे. त्यानुसार कर्मचारी वर्ग आहे; मात्र इतर जिल्ह्याशी तुलना केली तर जिल्ह्याचे कर्मचारी खूप चांगले आहेत. कोणतीही घटना घडल्यास तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्याला सुरवात करतात. प्रत्येकवेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांना दोष देण्यात अर्थ नाही, असे साबळे म्हणाले. 

सेवानिवृत्त वनाधिकारी म्हणाले....

शिकारीचे प्रमाण वाढलेय, नैसर्गिक साखळी चाललीय तुटत 
व्याघ्रगणना होते, तशी बिबट्यांची होते पाणवठ्यावरील गणना 
गणनेत किती बिबटे आहेत, हे नेमके नाही सांगू शकत 
रत्नागिरीत वाढते हल्ले; बिबट्यांचे प्रमाण वाढल्याचे संकेत आहेत. 

 

संपादन - स्नेहल कदम  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to outrage and founder of leopard in ratnagiri and only 1 percent forest area in ratnagiri