esakal | आता मासेमारी कशी करायची ; हर्णैतील नौका दिघी, जयगडमध्येच  
sakal

बोलून बातमी शोधा

Due to the stormy conditions that have prevailed for the last two days, fishing boats have taken shelter in Dighi and Jaigad creek

खाडीचा आसरा ; काही बंदरातच शाकारलेल्या

आता मासेमारी कशी करायची ; हर्णैतील नौका दिघी, जयगडमध्येच  

sakal_logo
By
राधेश लिंगायत

हर्णै (रत्नागिरी) : विजांच्या कडकडाटासह पाऊस, अचानक वादळी वारा अशा वातावरणातील बदलत्या परिस्थितीमुळे हर्णै बंदरातील मासेमारीला ब्रेक लागला आहे. गेल्या दोन दिवसांपासून निर्माण झालेल्या वादळी परिस्थितीमुळे मासेमारीस गेलेल्या नौकांनी दिघी आणि जयगड खाडीचा आसरा घेतला आहे. वातावरण शांत झाल्याशिवाय मासेमारीस समुद्रात जाणे धोक्याचं ठरेल, असे येथील मच्छीमारांनी सांगितले.


पापलेट, म्हाकूळ, सुरमई, कोळंबी आदी किंमती मासळी मिळत असतानाच किनारपट्टीवर पावसाळी वातावरण तयार झाले आहे. 6 तारखेस अचानक रात्री वादळ झाले. 7 तारखेस हवामान खात्याने मासेमारीकरिता न जाण्याचे आदेश दिले. दोन-तीन दिवसांनी विजांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला.


दोन दिवसांपूर्वी हर्णै बंदरातील मच्छीमार उत्तरेकडील बाजूस मासेमारीकरिता गेले असताना समुद्रामध्ये वादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने उत्तरेकडे मासेमारीस गेलेल्यांपैकी किमान 100 नौका दिघी खाडीत घुसल्या तर दक्षिणेकडे गेलेल्यांपैकी 70 ते 80 नौकांनी जयगड खाडीचा आसरा घेतला.जवळपास मासेमारी करणार्‍या मच्छीमारांनी आंजर्ले खाडीमध्ये पलायन केले. वातावरण शांत होईल तेव्हा नौका बंदरात येतील. अजूनही किमान 20 ते 30 मासेमारी नौका नांगर टाकून दिघी खाडीत उभ्या आहेत, असे येथील मच्छीमारांनी सांगितले.

हेही वाचा- घेतला अंदाज अन् बंद घरातून चोरट्याने मारला एक लाख 90 हजारांवर डल्ला ! -

काही प्रमाणात वादळी स्थितीही आहे. सध्या नौकांना अपेक्षित प्रमाणात मासळी मिळत नाही. वातावरण बदलत असल्याने काहींनी समुद्रात मासेमारीसाठी जाणे टाळले. काही नौका येथील बंदरातच शाकारलेल्या तर अजूनही बहुतांशी नौका आंजर्ले खाडीतच उभ्या आहेत. निसर्गातला बदल वारंवार होत राहिला तर मासेमारी कशी करायची? 
अनंत चौगले, मच्छीमार, हर्णै 

संपादन- अर्चना बनगे

loading image