'चिपळूणातील वाढीव कामांचे भवितव्य जिल्हाधिकार्‍यांच्या भूमिकेवर'

मुझफ्फर खान
Friday, 16 October 2020

साडेआठ कोटीची कामे तांत्रिक अडचणीत सापडली आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या भूमिकेवर या कामांचे भवितव्य अवलंबून आहे. 

चिपळूण (रत्नागिरी)  : शहरातील विकासाची साडेआठ कोटीची वाढीव कामे महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी ठेकेदारांकडून करून घेतली. कामे पूर्ण झाल्यानंतर नगरसेवकांनी रंग बदलले. पूर्ननियोजनाच्या सभेतही वाढीव कामांना महाविकास आघाडीने विरोध केला. त्यामुळे साडेआठ कोटीची कामे तांत्रिक अडचणीत सापडली आहेत. जिल्हाधिकार्‍यांच्या भूमिकेवर या कामांचे भवितव्य अवलंबून आहे. 

हेही वाचा - Photo : मेहनतीवर पाणी फिरल्याचं दुःख ठेवले बाजूला,ओल्याच भाताची मळणी झाली सुरू -

शहरातील 19 विकास कामांवर चुकीच्या पद्धतीने वाढीव खर्च झाल्याची तक्रार महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली. नगराध्यक्षांनी मनमानी करत हा खर्च केल्याचा आरोप करत त्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी सुरू आहे. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनूसार अर्थसंकल्पाच्या पूर्ननियोजनाची बैठक पालिकेत घेण्यात आली. या बैठकीत अपक्ष नगरसेवक अविनाश केळस्कर यांनी तरतूद असलेल्या विकास कामांनाच मंजूरी देणे तसेच वाढीव कामांना मंजुरी न देण्याचा ठराव केला. 

संख्याबळाच्या आधारे महाविकास आघाडीने तो ठराव जिंकला. मात्र त्याचे दूरगामी वाईट परिणाम होतील असा इशारा राष्ट्रवादीच्या नगरसेविका शिवानी पवार यांनी सभेत दिला. जनतेचा निधी जनतेच्या कामासाठी खर्च केला जात असताना आपण एकमेकांची उणी-दुणी का काढत बसलो आहोत, असे पवार यांनी स्पष्ट केले. त्यावर नगराध्यक्षांनी स्पष्टीकरण दिले, निविदा प्रक्रियेला सामोरे जावून शहरातील जी विकासकामे ठेकेदारांनी घेतली आहेत त्यांच्याकडून वाढीव कामे करून घेण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनीच मांडला होता. 

समाजकल्याण सभापती उमेश सकपाळ वगळता सर्व नगरसेवकांच्या प्रभागात वाढीव कामे झाली. महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी ती करून घेतली. आता त्यांच्याकडून विरोध सुरू आहे. जिल्हाधिकारी यांनी केलेली सूचनाही महाविकास आघाडीला अमान्य असेल तर याबाबत जिल्हाधिकारी योग्य तो निर्णय घेतील, असे सांगितले आहे. 

हेही वाचा - गव्यांच्या कळपाने घेरल्यावरही तो डगमगला नाही ; सिंधुदुर्गातील स्पेशल चाइल्डची संघर्षमय कहाणी -

केलेल्या कामांची बिले मिळावी म्हणून ठेकेदारांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागितली आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी प्रशासनाकडे अहवाल मागितला तर प्रशासानाकडून काय अहवाल दिला जाईल. याची सर्वांना उत्सुकता आहे. महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनीच वाढीव कामे करून घेतली याबाबत प्रशासन आणि नगराध्यक्षांकडे लेखी पुरावा असेल तरच ठेकेदार आणि नगराध्यक्षांची बाजू भक्कम होईल. असे जाणकारांचे मत आहे. 

"अपक्ष नगरसेवक अविनाश केळस्कर फार हुशार आहेत. सभागृहात मांडण्यासाठीचा ठराव ते घरातून लिहून आणतात. त्यांच्या बुद्धीने महाविकास आघाडीचा कामकाज सुरू आहे. आमचा जिल्हाधिकार्‍यांवर विश्‍वास आहे. जिल्हाधिकारी योग्य तो निर्णय देतील." 

- आशिष खातू, नगरसेवक भाजप

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: due to technical problem 8 and half crore working are pending and its future is depends on collector in ratnagiri