धक्कादायक ; अन् नदीचे पाणी झाले पांढरे! 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 June 2020

शुद्ध पाण्याचे नमुने येईपर्यत नळपाणी योजना बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या. पर्याय म्हणून गावच्या विहिरीतील पाणी वापरण्यास सांगितले. 

चिपळूण - तालुक्‍यातील कुटरे, येगाव येथील जांभी नदीत आज अज्ञाताने मोठ्या प्रमाणात केमिकल टाकले. परिणामी नदीतून फेसाळलेले पाणी वाहू लागले. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या गावातील पाणी योजना बंद ठेवाव्या लागल्या.

प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर पोलिस, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य विभाग व पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहेचले. शुद्ध पाण्याचे नमुने येईपर्यत नळपाणी योजना बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या. पर्याय म्हणून गावच्या विहिरीतील पाणी वापरण्यास सांगितले. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार फुरूस, येगाव, कुटरे येथून जांभी नदी वाहते. आज सकाळी 9.30 च्या सुमारास रामवाडी पुलावरून अज्ञाताने नदीत केमिकल टाकले. मोठ्या प्रमाणात केमिकल टाकण्यात आल्याने नदीत पांढऱ्या शुभ्र रंगाचे फेसाळलेले पाणी वाहत होते. याची माहिती मिळाल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांना माहिती देण्यास सुरवात झाली. येगावचे उपसरपंच, पोलिस पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष आणि पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. त्यांच्याकडून परिसरातील ग्रामपंचायतींना माहिती देण्यात येत होती. फुरूस, कुटरे, येगांव, कुंभारखाणी, कुचांबे, कुशिवडे, खेरशेत, मुरडव, आरवली, कोंडिवरे, बुरबांड, माखजनपर्यंत वाहते.

या नदीवर आजूबाजूच्या गावातील अनेक नळपाणी योजना अवलंबून आहेत. नदीत नेमके कोणी आणि कोणते केमिकल टाकले, याचा कोणालाच अंदाज येत नव्हता. ग्रामपंचायतींना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पाणी योजनांचे विद्युत पंप बंद केले. येथील काही ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी सावर्डे पोलिस ठाण्यास माहिती देत घटनास्थळाची पाहणी करण्याची मागणी केली. तहसीलदार जयराज सुर्यवंशी यांनी पंचायत समितीच्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी उपसा बंद ठेवण्याबाबत सूचना दिली. गटविकास अधिकारी सरिता पवार यांनीही ग्रामसेवकांशी संपर्क साधून खबरदारी घेण्याची सूचना केली. नदीकाठी ग्रामस्थांना उग्र वास येत होता. दरम्यान, येगावसह काही ग्रामपंचायतींनी या पाण्याचे नमुने ताब्यात घेतले आहे. त्याची तपासणी होणार आहे.

 हे पण वाचा - आत्महत्या हाच शेवटचा पर्याय असतो का?

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dumped chemicals in Jambi river