सिंधुदुर्गात नोंदवला भूकंपाचा धक्का : तिलारीत 3.7 रिश्टर स्केल ; Earthquake | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Earthquake

तिलारीसारख्या पाणलोट क्षेत्रात भूकंपाचे धक्के जाणवू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले.

सिंधुदुर्गात नोंदवला भूकंपाचा धक्का : तिलारीत 3.7 रिश्टर स्केल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ओरोस: सिंधुदुर्ग जिल्ह्यात भूकंपाचा धक्का नोंदवला गेला. तिलारी भूकंप क्षेत्रात मध्यरात्री ३.७ रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली आहे. मध्यरात्री २ वाजून ३४ मिनिटांची धक्का नोंद झाला; मात्र भूकंपाचे धक्के तिलारी क्षेत्रात जाणवलेले नाहीत, अशी माहिती तिलारी भूकंप वेधशाळा कोनाळकट्टाचे अधिकारी त्रंबे यांनी दिली.

रविवारी (ता.१३) मध्यरात्री राज्यातील काही भागांत भूकंपाचे धक्के जाणवले. कोकण पट्ट्यातील देवरुख भागात सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथील आंतरराज्य असलेल्या तिलारी धरण क्षेत्रात सुद्धा भूकंप झाल्याची नोंद झाली आहे. याची तीव्रता ३.७ रिश्‍टर स्केल एवढा कमी असल्याने तो तिलारी क्षेत्रात जाणवला नाही. याबाबत तिलारी भूकंप वेधशाळा कोनाळकट्टाचे अधिकारी त्रंबे यांना विचारले असता, भूकंपाचा धक्का बसल्याची नोंद झाली आहे; मात्र, भूकंपाचे धक्के जाणवले नाहीत, असे सांगितले.

हेही वाचा: 'ए दोस्‍ती हम नही तोडेंगे': विरोधकांच्या अफवांवर विश्‍‍वास ठेवू नका

कमी तीव्रतेचा भूकंप धक्का असल्याने नुकसानीची शक्यता नाही. हा भूकंप जाणवला नाही; परंतु तिलारीसारख्या पाणलोट क्षेत्रात भूकंपाचे धक्के जाणवू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. तिलारीबरोबरच कोकण पट्ट्यातील अन्य भागात भूकंपाची नोंद झाली आहे. त्यामुळे पूर्ण कोकणपट्टा भूकंपाच्या छोट्या धक्क्याने जागृत झाला आहे.

चांदोलीतही धक्का

शिराळा (जि. सांगली) : चांदोली धरण व परिसरात सोमवारी (ता.१५) पहाटे दोन वाजून ३६ मिनिटांनी ३.२ रिश्टर स्केलचा सौम्य भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती वारणा पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी टी. एस. धामणकर यांनी दिली.

loading image
go to top