'ए दोस्‍ती हम नही तोडेंगे': विरोधकांच्या अफवांवर विश्‍‍वास ठेवू नका; मुश्रीफांचे आवाहन : Hasan Mushrif | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satej patil, hasan muhsrif

राजेंद्र पाटील यड्रावकरांसोबत चर्चा करुन पालकमंत्री पाटील यांच्या प्रचारात सक्रीय करणार.

'ए दोस्‍ती हम नही तोडेंगे': विरोधकांच्या अफवांवर विश्‍‍वास ठेवू नका

sakal_logo
By
सदानंद पाटील

कोल्‍हापूर : पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil)हे आमचे मित्र आहेत. विधानपरिषदेची निवडणूक ते लढवत आहेत. त्यांच्या उमेदवारीची घोषणाच मी केली आहे. या निवडणुकीत मला व राष्‍ट्रवादी काँग्रेसला मानणार्‍या मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. हे सर्व मतदार पालकमंत्री पाटील यांना भरघोस मतांनी निवडून आणतील, याचा मला पूर्ण विश्‍‍वास असल्याचे सांगत ए दोस्‍ती हम नही तोडेंगे, असे सांगून विरोधक पसरवत असलेल्या अफवांवर विश्‍‍वास ठेवू नका,असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)यांनी केले. मात्र दुसरीकडे राज्य स्‍तरावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)जी वक्‍तव्ये करत आहेत, ती काही बरोबर नसल्याचे सांगत चुकीच वक्‍तव्ये न करण्याचा सल्‍ला मंत्री मुश्रीफ यांनी दिला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे एकमेव दुकानही बंद होईल, असे वक्‍तव्य केले आहे. या वक्‍तव्यावर मंत्री मुश्रीफ सविस्‍तर बोलत होते. ते म्‍हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. आता विधानपरिषदेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत आम्‍ही काँग्रेस व आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी रात्रीचा दिवस करत आहोत. जिल्‍ह्यात काँग्रेसचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासाठी राष्‍ट्रवादीचे कार्यकर्ते झटत आहे. अशीच परिस्‍थिती इतर मतदार संघात आहे. असे असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी राष्‍ट्रवादीबाबत चुकीचे विधान केले आहे. हे काही बरोबर नाही. कार्यकर्त्याचे खच्‍चीकरण करण्याचा हा प्रकार असून त्यांनी तो तात्‍काळ थांबवावा, अशी मागणी मंत्री मुश्रीफ यांनी केली.

हेही वाचा: चौथीही सभा तहकूब! भुयारी गटारीसाठी विरोधकांचा आक्रमक पवित्रा

जिल्‍ह्यात इकडे तिकडे लक्ष देवू नये

पालकमंत्री सतेज पाटील यांचा जिल्‍ह्यात वावर वाढला आहे. वास्‍तविक त्यांनी सर्वांशी समझोत्याने घेणे आवश्यक आहे. त्यामुळे काही लोकप्रतिनिधी नाराज आहेत. थोडेशे फटकून वागत आहेत. मात्र या सर्वांशी चर्चा करुन त्यांना मंत्री पाटील यांच्या प्रचारात सक्रीय करणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

अफवांवर विश्‍‍वास नको

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पालकमंत्री व्‍हायचे आहे, अशी चर्चा आहे. याबाबत विचारले असता मंत्री मुश्रीफ म्‍हणाले, ज्या जिल्‍ह्यात ज्या पक्षाचे जादा आमदार त्या पक्षाचा पालकमंत्री असे सूत्र आहे. त्यानुसार कोल्‍हापूर जिल्‍ह्यात राष्‍ट्रवादीपेक्षा काँग्रेसचे आमदार सर्वाधिक आहेत. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसचे पालकमंत्री आहेत. पाटील यांच्याऐवजी कोणीही काँग्रेसचाच पालकमंत्री होवू शकतो. त्या ठिकाणी राष्‍ट्रवादीचे कोणी होणार नाही. हे सर्व माहिती असतानाही अशा प्रकारच्या अफवा पसरवून विरोधक दिशाभूल करत आहेत. मात्र त्यांच्या या अफवाचा परिणाम होणार नाही. पालकमंत्री पाटील हे उच्‍चांकी मतांनी निवडून येतील, असे मुश्रीफ यांनी स्‍पष्‍ट केले.

यड्रावकरांची समजूत काढणार

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हे महाविकास आघाडीचे घटक आहेत. मात्र जिल्‍हा बँकेच्या निवडणुकीत शिरोळ येथून काँग्रेसने उमेदवारासाठी जोर लावला आहे. त्यामुळे ते नाराज आहेत. म्‍हणूनच काँग्रेसने जरा सबुरीने घेणे आवश्यक आहे. आपण लवकरच मंत्री यड्रावकरांसोबत चर्चा करणार असून, त्यांना पालकमंत्री पाटील यांच्या प्रचारात सक्रीय करणार असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

loading image
go to top