कोकणचा पुन्हा सन्मान ; शिवसेना पक्ष प्रवक्तेपदी उदय सामंत यांची निवड

राजेश शेळके
Tuesday, 8 September 2020

राज्यात अन्य दहा जणांच्या नियुक्तीमध्ये उदय सामंत यांचे नाव आहे.

रत्नागिरी : शिवसेनेने रत्नागिरीला पुन्हा झुकते माप दिले आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांची शिवसेना पक्ष प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे मुख्य प्रवक्ते असून राज्यात अन्य दहा जणांच्या नियुक्तीमध्ये उदय सामंत यांचे नाव आहे. त्यामुळे रत्नागिरीसह कोकणातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

हेही वाचा - मच्छीमारांनो सावधान...! समुद्रात जाताय ? तुमच्यासाठी आहे ही महत्वाची बातमी 

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नुकतीच याची घोषणा करण्यात आली. खासदार राऊत यांच्याबरोबर खासदार अरविंद सावंत, खासदार धैर्यशील माने, खासदार प्रियांका चतुर्वेदी, आमदार डॉ. नीलम गोरे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, परिवहन मंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, आमदार सुनील प्रभू, आमदार प्रताप सरनाईक, महापौर किशोरी पेडणेकर यांची शिवसेना पक्ष प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा -  तुमचं जनावर चोरीला गेले आहे ? आता ते परत मिळु शकतं ; कसे ते वाचा 

राजकारणातील अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणून उदय सामंत यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळेच ते आज शिवसेनेच्या दिग्गजांच्या पंक्तीत आहेत. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकौशल्याने मोतोश्रीवर चांगलाच प्रभाव पाडला. त्यामुळे निवडणुकीच्या कालात पुण्याची जबाबदारी त्याच्याकडे देण्यात आली होती. त्यानंतर शिवसेना उपनेते म्हणून पक्षाने त्यांना मान दिला. त्यानंतर राज्य मंत्रीमंडळात उच्च व तंत्रशिक्षण खात्याची कॅबिनेट पदाची देऊन कोकणाचा सन्मान केला होता. आता शिवसेना पक्षाने नव्याने त्यांच्या खांद्यावर पक्षप्रवक्तेपदाची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या निवडीमुळे कोकणातील शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 

संपादन - स्नेहल कदम   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: education minister uday samant selected as a spokesperson of shivsena in ratnagiri