सोशल मीडियावर प्रचाराचा धुरळा

तुषार सावंत
Monday, 11 January 2021

गावपातळीवरील प्रचार आता रंगात आला असून एका एका मताला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

कणकवली (सिंधुदुर्ग) - निवडणुका म्हटल्या, की प्रचार आणि जाहिराती हे ठरलेले गणित; परंतु यंदाच्या अटीतटीच्या व प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायत निवडणुकातील उमेदवारांचा सोशल मीडियावर प्रचार सुरू झाला आहे. निवडणुका असलेल्या गावातील प्रभागात लढतीतील उमेदवार डिजिटल प्रचारावर भर देत आहेत. त्यात राजकारणातील उणीदुणी काढली जात आहेत. गावपातळीवरील प्रचार आता रंगात आला असून एका एका मताला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

पूर्वीच्या काळी प्रचाराची खूप वेगळी पद्धत होती. उमेदवाराचा प्रभाग, नाव, चिन्ह भिंतीवर काढले जायचे. कालांतराने प्रचार पद्धतीत बदल होत गेल्यामुळे आता प्रचारात थेट सोशल मीडियाचा वापर होऊ लागला आहे. निवडणूक आयोगाने यावर कितीही मर्यादा घालण्याचा प्रयत्न केला. सध्या तरी सोशल मीडियावरून प्रचार रोखणे अशक्‍य झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून सोशल मीडिया यज्ञ धगधगू लागला आहे.

कार्यकर्ते रात्रंदिवस सोशल मीडियावर अपडेट टाकत आहेत. यात गावातील विकास कामांचा आणि भ्रष्टाचाराच्या आरोपात प्रत्यारोपण चित्र मांडले जात आहे. सोशल मीडियावरील प्रचारातून आता कोण बाजी मारणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागून आहे. निवडणुकीचे चित्र स्पष्ट होताच पॅनल प्रमुख, विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उमेदवारांच्या ग्रामदेवताना श्रीफळ वाढवून प्रचाराच्या धूमधडाक्‍यात शुभारंभ सुरू केला.

कार्यकर्त्यांनी तात्काळ प्रचाराचे फोटो, अपडेट माहितीचा व्हॉट्‌सऍप फेसबुकच्या माध्यमातून सोशल मीडियावर पोस्ट टाकून प्रचाराला सुरुवात केली आहे. गावगाड्यात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागल्याने सोशल मीडियावर प्रचाराचा धरळा उडू लागला आहे. 

यंदा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून जिल्ह्यात 70 ग्रामपंचायती आहे; मात्र काही ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या आहेत तर काही प्रभागात ही उमेदवार बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित जेथे निवडणुका होत आहेत अशा प्रभागांमध्ये अनेक गावात सध्या सोशल मीडियावर प्रचाराचा रंग तापू लागला आहे. 

व्हॉट्‌सऍप, फेसबुकचा वापर 
तरुण वर्गाच्या माध्यमातून सोशल मीडिया मोठ्याप्रमाणात चालवला जातो. बहुतांशी गावांमध्ये आपल्या गावातील तरुणांचा व्हाट्‌सअप ग्रुप ही बनवला आहे. या व्हॉट्‌सऍप ग्रुपच्या माध्यमातून तरुण वर्गाने विविध प्रकारचा प्रचार सुरू केला आहे. ग्रुपच्या माध्यमातून गावाची समस्या व सर्वांगीण विकास या संदर्भातील योग्य उमेदवार कोण याची जनजागृती केली जात आहे. 

नेत्यांची कसोटी 
जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे; मात्र पक्ष प्रवेश आणि बिनविरोध आलेले उमेदवार हे आपलेच आहेत. हे सांगण्यासाठी प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता सरसावला आहे. त्यामुळे जिल्ह्यापासून राज्यस्तरावर कार्यरत असलेल्या नेत्यांची कसोटी लागली आहे. यंदा जिल्ह्याचे राजकीय वातावरण वेगळ्या परिस्थितीतून जात आहे. पक्षांतर मुळे अनेक नेते इकडे तिकडे गेले आहेत. त्या सगळ्या नेत्यांची आता कसोटी आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: election campaign social media konkan sindhudurg