तांदळाच्या राशी आणि हळद, लिंबू पाहून उंचावल्या भुवया ; मतदान केंद्रावर चर्चेला उधान

रुपेश हिराप
Friday, 15 January 2021

सकाळीच प्रभाग चार आणि पाचमध्ये रस्त्यावर तांदळाच्या राशीवर, हळद, पिंजर व लिंबू दिसून आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : सावंतवाडी तालुक्यात अकरा ग्रामपंचायतीसाठी आज सकाळपासून शांततेत मतदान प्रक्रिया सुरू झाली. बऱ्याच ठिकाणी वयस्कर व्यक्तींना मतदान यंत्रावरील अस्पष्ट चिन्हामुळे मतदान करताना अडचण निर्माण झाली, तर बहुचर्चित असलेल्या कोलगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आला. सकाळीच प्रभाग चार आणि पाचमध्ये रस्त्यावर तांदळाच्या राशीवर, हळद, पिंजर व लिंबू दिसून आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

तालुक्यातील कोलगाव, आंबोली, चौकुळ, तळवडे, मळगाव, मळेवाड, आरोंदा, आरोस, दांडेली, डिंगणे, इन्सुली या ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे बऱ्याच ठिकाणी सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी उस्फूर्त प्रतिसाद दर्शविली. काही ठिकाणी मात्र मतदान केंद्रावर तुरळक गर्दी दिसून आली. दुपारी अकरानंतर निवडणूक केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. बऱ्याच ठिकाणी वयस्कर व्यक्तींना मतदान यंत्रावरील उमेदवार चिन्ह अस्पष्ट असल्याने मतदान करण्यास काहीसा अडथळा निर्माण झाला. त्यामुळे याठिकाणी उमेदवारांना फटका बसण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा - सरवडे - राधानगरीच्या युवकाने पिस्तुल कणकवलीतून आणल्याचे केले कबूल

दुसरीकडे कोलगाव ग्रामपंचायतीच्या चुरशीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा जादूटोण्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. कोलगाव हद्दीतील रस्त्यावर सकाळी लिंबू, हळद, पिंजर आणि तांदूळ ग्रामस्थांना दिसून आले. त्यामुळे या प्रकाराची चर्चा कोलगावमध्ये सुरु झाली. इन्सुली तसेच मळगाव आणि तळवडेमध्येही मोठी रस्सीखेच आहे. या ठिकाणीही मतदारांनी मतदानासाठी मोठी गर्दी केली होती. तालुक्यातील सभापती, उपसभापती पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य यांच्या गावांमध्ये या निवडणुका होत असल्याने सर्वांचे वर्चस्व पणाला लागले आहे. या ठिकाणी महाविकासआघाडी विरुद्ध भाजप असे लढत पाहायला मिळत असून महाविकासआघाडी मध्ये बऱ्याच ठिकाणी झालेली आघाडी कोणाच्या पत्त्यावर पडते हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांची तीन विशेष पथकेही अकरावी ग्रामपंचायतीच्या या निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. एकूणच लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ग्रामस्थांचा मतदान करण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे.

हेही वाचा -  बिलांचा कारभार आता पारदर्शक ; पैसे थेट ठेकेदारांच्या खात्यात जमा -

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: election start in konkan also but black magic incident in sawantwadi sindhudurg