बांदा - दोडामार्ग तालुक्यातील मुख्य कळपापासून दुरावलेला तरुण 'ओंकार' हत्ती सध्या नेतर्डे, मोपा परिसरात धुडगूस घालत असून सिंधुदुर्ग-गोवा राज्याच्या सीमेवर सध्या त्याचीच जोरदार चर्चा रंगली आहे..कधी महाराष्ट्राच्या हद्दीत तर कधी गोव्याच्या जंगलात उभा ठाकणारा हा हत्ती, दोन्ही राज्यांच्या वनविभागांच्या पथकांचा अक्षरशः खेळ करून सोडत आहे. सिंधुदुर्ग व गोवा वनविभागाची पथके त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर 'ओंकार' हत्ती दोन्ही पथकांना शिताफिने गुंगारा देत झुलवत आहे..गेल्या चार दिवसांपासून ओंकार सावंतवाडी तालुक्यातील नेतर्डे, डिंगणे, गाळेल, डोंगरपाल तर गोव्यातील कडशी, मोपा, तोरसे, दुजगी परिसरात फेरफटका मारून धुडगूस घालत आहे. दोन्ही राज्यांच्या सीमेवरील गावात त्याचा बिनधास्त वावर सुरु आहे. हत्ती दिसल्याची माहिती मिळताच दोन्ही राज्यांच्या वनविभागांची पथके घटनास्थळी दाखल होतायत; पण ‘ओंकार’ला हुसकावणे किंवा जंगलाच्या आत वळवणे, हे मात्र कुणालाच जमेनासे झाले आहे..स्थानिकांमध्ये या हत्तीबाबत उत्सुकता असून, ठिकठिकाणी त्याला पाहण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. मात्र वनविभागाने लोकांना सुरक्षित अंतर ठेवण्याचे व कोणत्याही प्रकारे हत्तीला चिथावणी न देण्याचे आवाहन केले आहे.‘ओंकार’च्या सततच्या सीमा दौऱ्यामुळे गावागावात चर्चा रंगली आहे. हत्तीला परतवून लावणे दोन्ही वनविभागांच्या पथकांना मुश्किल झाल्याने स्थानिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिंधुदुर्ग व गोव्याच्या सीमेवर हत्तीच्या वावराने नागरिकांमध्ये थरार आणि वनविभागात मात्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे..शुक्रवारी रात्री ओंकार हत्ती दोडामार्ग येथून सावंतवाडी तालुक्यात दाखल झाला. एका रात्रीत त्याने तब्बल ४० किलोमीटरहून अधिक प्रवास केला. ओंकार सावंतवाडी तालुक्यात डेगवे, नेतर्डे, डोंगरपाल येथे आल्याने सिंधुदुर्ग वनविभाग अलर्ट झाला. या हत्तीचा दोन दिवस वावर हा गोवा सीमेवरील नेतर्डे गावात होता. वनविभागाचे पथक त्याच्यावर लक्ष ठेऊन होते.हा हत्ती गोव्यात येऊ नये यासाठी गोवा वनविभागाने देखील सिंधुदुर्ग सीमेवर फिल्डिंग लावली होती. मात्र ओंकारने रात्रीच गोव्यात प्रवेश करत मोपा गावात मुक्काम केला. त्यानंतर भल्या पहाटे त्याने पुन्हा नेतर्डे गावात प्रवेश केला. दोन्ही राज्यांच्या सीमेवरील गावात त्याचा वावर वाढल्याने दोन्ही वनविभागाच्या पथकांची चांगलीच दमछाक झाली..गोव्याकडे अपुरी यंत्रणागोवा राज्यात हत्तींचा अधिवास व वावर हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तुलनेत अत्यल्प असल्याने गोवा वनविभागाच्या पथकाला हत्तीला हुसकावून लावण्याचे कसब अवगत नाही. तसेच गोवा वनविभागाकडे अपुरी यंत्रणा व साहित्य असल्याने हत्तीचा नेमका माग काढण्यात अपयश येत आहे..फटाके फोडून हत्तींना हुसकावून लावण्यात अपयश येत आहे. फटाक्यांच्या आवाजाची सवय झाल्याने हत्ती या प्रकाराला न जुमानता थेट लोकवस्तीतून मार्गक्रमण करत आहे.ओंकार हा सातत्याने आपली दिशा बदल असल्याने कधी तो गोवा तर कधी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करत आहे. दोन्ही वनविभागाच्या पथकांना तो सातत्याने झुलवत ठेवून प्रवास करत आहे. दोन्ही राज्यांच्या वनविभागांची पथके ही सीमेवर ठाण मांडून असून ओंकार हत्तीला एकमेकांच्या हद्दीत हुसकावून लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मातृ ओंकार या प्रयत्नांना दात देत नसल्याने दोन्ही वनविभागांची पथके हतबल झाल्याचे चित्र आहे..बघ्यांची गर्दी तर ओंकार आक्रमक..ओंकार हत्तीचा वावर हा लोकवस्ती नजीक व मुख्य महामार्गाच्या बाजूलाच असल्याने त्याला पाहण्यासाठी दिवस-रात्र बघ्यांची मोठी गर्दी उसळली आहे. रात्रीच्या वेळी प्रखर प्रकाश झोतांचा मारा करून आरडाओरडा करत त्याला पिटाळण्यासाठी स्थानिक गर्दी करत असल्याने ओंकार हा आक्रमक झाला आहे..डिंगणे, फकीरफाटा तसेच तोरसे येथे तो स्थानिकांच्या अंगावर धावून जाण्याचे देखील प्रकार घडले आहेत. स्थानिकांच्या गर्दीमुळे ओंकार हा बिथरला असून तो वाट मिळेल तिथे सैरावैरा धावत आहे. त्यामुळेच त्याचा नेमका ठावठिकाणा शोधणे वनविभागाला कठीण जात आहे. ओंकार हत्ती मुख्य कळपात न परतल्यास भविष्यात दोन्ही राज्यांच्या वनविभागाच्या पथकांची डोकेदुखी निश्चितच वाढणार आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.