तिलारी धरण परिसरातील केंद्रेत होणार हत्ती अभयारण्य 

प्रभाकर धुरी
रविवार, 21 जुलै 2019

दोडामार्ग - तिलारी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील केंद्रे येथे हत्तींचे अभयारण्य उभारण्यात येणार आहे. केर येथील बैठकीवेळी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी तसे संकेत दिले. बुडीत क्षेत्रातील हजारो हेक्‍टरमध्ये अभयारण्य असेल. त्यामुळे तिलारीत अभयारण्य होणार की हत्तींना पुन्हा कर्नाटकात पाठवले जाणार याबाबतचा संभ्रम दूर झाला आहे. 

दोडामार्ग - तिलारी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील केंद्रे येथे हत्तींचे अभयारण्य उभारण्यात येणार आहे. केर येथील बैठकीवेळी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी तसे संकेत दिले. बुडीत क्षेत्रातील हजारो हेक्‍टरमध्ये अभयारण्य असेल. त्यामुळे तिलारीत अभयारण्य होणार की हत्तींना पुन्हा कर्नाटकात पाठवले जाणार याबाबतचा संभ्रम दूर झाला आहे. 

कोल्हापूरपासून दोडामार्गपर्यंतच्या सर्वच वनाधिकाऱ्यांसह खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री दीपक केसरकर यांनी हत्तींना कर्नाटकात पाठवण्याऐवजी त्यांना तिलारीत ठेऊन पोसण्याची शासनाची तयारी असल्याचे वेळोवेळी सांगितले आहे. 

मंत्री केसरकर यांनी केर मधील हत्तीग्रस्तांची भेट घेतली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर हत्तींना वस्तीपासून दूर ठेवण्यासाठी अनुदानित सौरकुंपण, स्थानिक हाकारे, दोन गस्ती वाहने, फटाके, सव्वा दोनशे कुटुंबांना विजेऱ्या, मुलांना शाळेत सोडण्यासाठी वाहन आदी देण्याची ग्वाही दिली. हत्ती वस्तीत येऊ नयेत, यासाठी त्यांना तिलारीच्या बुडीत क्षेत्रात ऊस, केळी, बांबू आणि अन्य खाद्य उपलब्ध करून देण्याच्या आणि दिलेल्या 28 लाखांतून दगडी कुंपण उभारण्याच्या सूचना वनविभागाला केल्या. 

श्री. चव्हाण यांनी तिलारीच्या बुडीत क्षेत्राबाहेरील केंद्रे खुर्द आणि बुद्रुक गावच्या 76 हेक्‍टर क्षेत्रात हत्तींना मुबलक खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलली जात असल्याचे सांगितले. 
हत्तींचा पहिला कळप कर्नाटकातील मानमधून तिलारीत उतरला. त्याचा वावर 2 ऑक्‍टोबर 2002 साली सर्वप्रथम लक्षात आला. अकरा हत्तींच्या त्या कळपाची महाराष्ट्रातील पहिली एंट्री होती. वन्यजीव अभ्यासक आणि महाराष्ट्राच्या इतिहासाने त्याची नोंद घेतली. त्यानंतर हत्तींनी अख्खा जिल्हा पायाखाली घातला. अनेकांचे बळी गेले. त्यातील दोघे शिरंगे आणि कळणेत मृत्यूमुखी पडले. तर माणगाव खोऱ्यात हत्ती पकड मोहीम राबवल्यावर चार हत्तींचा बळी गेला.

वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरणप्रेमींनी त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तरीही हत्तींचा धुमाकूळ सुरुच राहिला. त्यामुळे दोडामार्गमधील काही शेतकऱ्यांनी हत्ती पकड मोहीम राबवण्याची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयाने मात्र हत्ती हटाव मोहीम राबवण्यास अनुकूलता न दाखवल्याने शासन आणि वनविभागाने नुकसानीची तीव्रता कमी करण्याचे उपाय योजायला सुरवात केली आणि भरपाई तत्काळ मिळेल, अशी यंत्रणा उभी केली. दुसरीकडे तिलारी धरणाच्या बुडीत क्षेत्राबाहेरील हजारो हेक्‍टर क्षेत्रात हत्तींनी अधिवास निर्माण केल्याने त्यांना त्याच परिसरात खाद्य उपलब्ध करून देऊन वस्तीत येण्यापासून त्यांना परावृत करण्याचे प्रयत्न वनविभागाने गुपचूप सुरू केले.

खासदार राऊत, पालकमंत्री केसरकर आणि श्री. चव्हाण यांनी तिलारीत हत्ती अभयारण्य उभे राहणार असल्याचे संकेत देऊन अभयारण्य होणार की हत्तींना कर्नाटकात पाठवले जाणार या शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाला जवळजवळ पूर्णविराम दिला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elephant sanctuary will be located in the center of Tilari dam area