माणसे घरात, हत्ती मात्र रस्त्यात

Elephants on road dodamarg sindhudurg
Elephants on road dodamarg sindhudurg

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे बहुतेक सगळेच रस्ते निर्मनुष्य झालेत. वाहनांची वर्दळ थांबली आहे. नेहमीचा गोंधळ, गजबजाट बंद झाला आहे. एरवी रस्त्यावर, शेती बागायतीत फिरणारी माणसे घरात थांबली आहेत. त्यामुळे पशुपक्षी, वन्यप्राणी स्वच्छंदपणे बागडत आहेत. त्याला वन्यहत्ती तरी कसे अपवाद ठरतील. लॉकडाऊनमुळे माणसे घरात आणि प्राणी रस्त्यावर असे चित्र सध्या तिलारी खोऱ्यात पहायला मिळत आहे. या खोऱ्यातील बांबर्डे येथे दोडामार्ग बेळगाव राज्यमार्गावर भरदिवसा तीन हत्तींचा कळप मुक्तपणे विहार करताना दिसला. अनाहुतपणे रस्त्यावरून जाणाऱ्या एकाने त्या कळपाची छबी कॅमेऱ्यात कैद केली आणि लॉकडाऊनमुळे माणसे घरात तर हत्ती रस्त्यावर आल्याचे दृश्‍य जगासमोर आले. 

दोडामार्ग म्हणजे वन्य हत्तींचा तालुका. महाराष्ट्रातील हत्तींचे वैभव पाहायचे असेल तर दोडामार्गमध्येच यायला हवे. अकरा हत्तींचा पहिला कळप 7 ऑक्‍टोबर 2002 ला आला तो दोडामार्गमधील मांगेलीत. कणकीची मुबलक बेटे, मनमुराद डुंबायला तिलारी धरणाचा पुरेसा पाणीसाठा, तिलारीच्या बुडीत क्षेत्राबाहेर गर्द जंगल, परिसरात भातशेती, फणस, केळीबागा यासारखे भरपूर खाद्य. त्यामुळे हत्ती इथे स्थिरावलेत. गोव्यासह जिल्ह्यातील अनेक गावांत त्यांनी मजल दरमजल केली; पण खऱ्या अर्थाने ते रमलेत ते तिलारी परिसरातच. त्यांनी शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसानही केले. शासनाने भरपाईही दिली. अर्थात ती समाधानकारक नाहीय. असे असले तरी हत्तींचा वावर अधूनमधून सुरुच असतो. ते कधी चंदगड, कोल्हापूरातील गावात धुडगूस घालतात तर कधी दोडामार्ग तालुक्‍यात. आता तर त्यांची संख्या वाढते आहे. सध्या तिलारीत पाच हत्ती आहेत. एका कळपात दोन पिल्ले आणि एक मादी तर दुसऱ्या कळपात एक मोठा टस्कर आणि मादी. 

गेले काही दिवस त्यांचा वावर बांबर्डे, घाटिवडे, वीजघर परिसरात आहे; मात्र अचानक त्यातील एका कळपाचे दर्शन गुरुवारी भररस्त्यात झाले. मुंबईसारख्या शहरात भरवस्तीत मोर पिसारा फुलवून नाचताहेत, दुर्मिळ प्राणी शहरातील चौकात मस्तपणे विहार करताहेत. माणसांचा पूर ओसरल्याने गंगा आणि अन्य नद्यांचे प्रदूषण घटले आहे. अंगणात धीटपणे आता वेगवेगळे पक्षी येताहेत. त्यांच्या मंजुळ स्वरांनी परिसर मंगलमय झाला आहे. रस्त्यातील वाहनांची वर्दळ थांबल्याने हवेतील प्रदूषण थांबले आहे. त्यामुळे प्राणीही आता मोकळा श्‍वास घेत आहे. लॉकडाऊन आणि संचारबंदी पशू पक्षी आणि प्राण्यांच्या पथ्यावर पडली आहे. माणूस कोरोनाच्या भीतीने घरात थांबला असला तरी वन्यप्राण्यांसाठी लॉकडाऊन मुक्त विहारासाठीची संधी आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूला त्यांचा वावर वाढला आहे आणि तो दिलासादायक म्हणावा लागेल. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com