चित्रातला हत्ती जंगलात अवतरतो तेव्हा...

‘सकाळ’ने दिला होता अस्तित्वाचा पुरावा
Elephants spotted in Dodamarg Sindhudurg historic event save elephants
Elephants spotted in Dodamarg Sindhudurg historic event save elephantssakal
Summary

सिंधुदुर्गात हत्ती आता कायम रहिवासी झाले आहेत. यंदा हत्तीच्या आगमनाला २० वर्षे पूर्ण होत आहेत. हत्ती आणि सिंधुदुर्ग यांचे या काळातील नाते बरचशे संघर्षपूर्ण राहिले आहे. आता मात्र हत्तींना स्वीकारल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. हत्ती-मानव संघर्षाची तीव्रताही कमी झाली आहे. हा सगळा प्रवास उलघडणारी मालिका.

दोडामार्ग : संपूर्ण जगातील हत्तींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. हत्तींच्या अनेक जाती नष्ट झाल्या आहेत. असे असले तरी महाराष्ट्र मात्र हत्तींच्या बाबतीत सुदैवी म्हणावा लागेल. महाराष्ट्राच्या दक्षिणेला असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अगदी टोकाला गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या दोडामार्ग तालुक्यात पहिल्यांदा हत्तींचा वावर आढळला आणि देशाने त्या ऐतिहासिक घटनेची नोंद घेतली.

महाराष्ट्रात आलेले हत्ती कर्नाटकातील दांडेली अभयारण्यातून आले. ७ ऑक्टोबर २००२ मध्ये पहिल्यांदा हत्तींच्या कळपाचे दर्शन झाले. तो कळप कर्नाटकातील मान, सडा भागातून मांगेलीच्या फणसवाडीतून मांगेली गावात उतरला. त्यामुळे मांगेली गाव हत्तींचे महाराष्ट्रातील प्रवेशद्वार ठरले. हत्तींच्या कळपाकडून दररोज नुकसान होत होते. मोठमोठे कवाथे, माड हत्ती धक्का देऊन जमीनदोस्त करत होते. केळीच्या बागा, वायंगणी भातशेती, साठवून ठेवलेले व पिकलेले भातपीक हत्ती फस्त करत होते; पण वन विभाग मात्र हत्तींचे अस्तित्व मान्य करायला तयार नव्हते.

त्याच दरम्यान तिलारी दौऱ्यावर आलेल्या तत्कालिन वन सचिव अशोक खोत यांनी मांगेलीतून आलेल्या शेतकऱ्यांची व्यथा ऐकून घेण्याऐवजी हत्ती आहेत कुठे, ते नुकसान हत्तींनी नाही तर डुकरांनी केले असेल असे विचित्र विधान तिलारी विश्रामगृहावर सर्वांच्या समक्ष केले होते. गावकऱ्यांनी त्यांच्या त्या वक्तव्याचा समाचार घेतल्याने त्यांनी नरमाईची भूमिका घेतली होती. हत्तीचा विषय त्यावेळेला किती अविश्वासाचा होता हे त्यातून स्पष्ट होते. त्याच पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ टीमने जंगल भ्रमंती करून अकरा हतींच्या कळपाचे फोटो आणि व्हिडिओ सर्वात प्रथम काढून ते प्रसिद्ध केले आणि त्यानंतर हत्तींच्या आगमनावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केले गेले.

तोपर्यंत सिंधुदुर्गातील बहुसंख्य रहिवाशांनी हत्ती चित्रात आणि चित्रपटात पाहिला होता. गणेश कथांमधून हत्तींच्या सुरस कथा ऐकल्या होत्या. तालुक्यातील मांगेलीत आलेले हत्ती दररोज नवनवी गावे पादाक्रांत करत होते. त्यांची पावले शेती बागायतीत उमटत होती. लोकांनी मग त्या पावलांचीच पूजा भक्तिभावाने करायला सुरवात केली. भविष्यात तीच पावले त्यांच्या पोटावर पडतील यांची त्यांना त्यावेळी यत्किंचितही कल्पना नव्हती. त्यानंतरच्या काळात लोकांनी देव मानलेला हत्ती दैत्य कधी बनला हे त्यांनाही समजले नाही.

हत्ती वाचवण्याची गरज

दहा हजार वर्षांपूर्वी हत्तींच्या अकरा हजार जाती जगभरात होत्या. आजच्या घडीला केवळ तीनच जाती शिल्लक आहेत. शिकार हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. हत्ती हे महाराष्ट्राचे वैभव आहे. त्यामुळे महाराष्ट्राने हत्ती वाचवण्यासाठी पाऊल उचलण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com