अतिक्रमणाचा मुद्दा तापला, नगरसेविकेचा नगराध्यक्षांवर निशाणा, म्हणाल्या...

 Encroachment issue Sawantwadi corporator's press conference
Encroachment issue Sawantwadi corporator's press conference

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - अतिक्रमणाच्या नावाखाली नगराध्यक्ष संजू परब हे व्यापारीवर्गावर दडपशाही व सुडाचे राजकारण करत आहेत; मात्र मुख्याधिकारी माहीत असूनही माहीत नसल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांसह भाजी विक्रेत्यांनी खचू नये, शिवसेना व्यापाऱ्यांच्या पाठीशी असून योग्य वेळी रस्त्यावर उतरेल, अशा इशारा शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी आज येथे दिला. पावसाळ्यात अशी कारवाई करणे मुळात कायद्याला धरुन नसून याला जबाबदार असलेल्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी आपण पालकमंत्र्याजवळ करणार असल्याचेही लोबो यांनी सांगितले. 

येथील माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी लोबो यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेची भूमिका मांडली. त्यांच्यासोबत शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, नगरसेवक तथा शहरप्रमुख बाबु कुडतरकर, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, नगरसेविका शुभांगी सुकी, भारती मोरे, माधुरी वाडकर, दिपाली सावंत, महिला संघटक अपर्णा कोठावळे, प्रशांत कोठावळे, कृतिका दळवी, शैलेश गवंडळकर आदी उपस्थित होते. 

लोबो म्हणाल्या, ""गेली 35 वर्ष पालिकेमध्ये काम केले; मात्र कोणावर अन्याय केला नाही. नगराध्यक्षांनी भाजी मंडईबाबत घेतलेला निर्णय चुकीचा नाही; मात्र तो निर्णय घेण्याची ही योग्य वेळ नसून पावसाळ्यात कोणाचे घर, दुकान, स्टॉल कायद्यात काढता येत नाही. असे असतानाही सणासुदीच्या तोंडावर गरिबांच्या पोटावर लाथ मारणे योग्य नाही.'' 

त्या पुढे म्हणाल्या, ""नगराध्यक्ष परब हे अनधिकृत स्टॉल हटवून चांगले काम केल्याचे दाखवत असताना दुसरीकडे त्यांनी शहरात अनधिकृतरित्या उभारलेल्या दहा-बारा स्टॉल कोणाचे व कशासाठी? हे सांगावे. हिंमत असेल तर त्यांनी त्या स्टॉलवर कारवाई करुन दाखवावी. नगराध्यक्ष दडपशाही आणि दहशतीच्या माध्यमातून सुडाचे राजकारण या ठिकाणी करत आहेत. त्यामुळे कोणीही व्यापारी त्यांच्या विरोधात पुढे यायला तयार नाही. अतिक्रमण व भाजी विक्रेत्यांना आठवड्याबाबत कोणालाच विश्‍वासात न घेता नगराध्यक्षांनी व सत्ताधाऱ्यांनी पाऊल उचलले आहे. याबाबत मुख्याधिकाऱ्यांना विचारले असता ते माहीत नसल्याचे सांगत आहेत. 

मुख्याधिकाऱ्यांना प्रश्‍न 
एखाद्या वेळी कौन्सिलमध्ये चुकीचा निर्णय घेतला तर त्याखाली ठरावावर मुख्याधिकाऱ्यांची टिपणी असणे गरजेचे असते; मात्र असे असतानाही आपल्याला माहित नाही, असे सांगणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांनी योग्य निर्णय का घेतला नाही? त्यामुळे, जर नगराध्यक्ष परब मला आई मानत असतील तर त्यांनी भाजीविक्रेत्यांबाबत चुकीचा निर्णय घेऊ नये. उलट त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा. आज पालिकेच्या मालकीचे गाळे देतानाही ते नियमाच्या बाहेर वाट्टेल त्याला देण्यात येत आहेत. गाळे देण्याला विरोध नाही. अधिकारी खोटे बोलत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पालकमत्र्यांकडे करणार आहे.'' 

ते सत्कार करणारे कोण? 
एकीकडे स्वच्छ सावंतवाडी करणारे नगराध्यक्ष दुसरीकडे अनधिकृत स्टॉलचे पुर्नवसन करतात हे कितपत योग्य? कारण कॉलेज रोड परिसरात रातोरात उभा राहिलेल्या स्टॉलची जागा डिपी रोडसाठी सोडलेली असताना त्याठिकाणी गाळा कसा उभा राहतो? त्यामुळे सत्कार करणारे ते कोण? व पुर्नवसन कोणाचे केले? हे वेळीच जनतेने ओळखावे, असे शहरप्रमुख बाबु कुडतरकर यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com