इंग्लडमधील पर्यटकांना बांद्यात घेतले ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 मार्च 2020

शहरातील सर्व आस्थापने यावेळी बंद ठेवली होती. पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी कर्मचाऱ्यांसह शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरातील बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवली होती. महामार्गावर पूर्णपणे शुकशुकाट होता.

बांदा ( सिंधुदुर्ग) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर आवाहन केलेल्या जनता कर्फ्युला शहरात 100 टक्के प्रतिसाद मिळाला. यावेळी शहरात थांबलेल्या दोन इंग्लड येथील पर्यटकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. 

शहरातील सर्व आस्थापने यावेळी बंद ठेवली होती. पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी कर्मचाऱ्यांसह शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरातील बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवली होती. महामार्गावर पूर्णपणे शुकशुकाट होता. सिंधुदुर्ग - गोवा सीमेवर वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली होती. पत्रादेवी सीमेवर गोवा व सिंधुदुर्ग पोलिसांची पथके तैनात केली होती. महामार्ग तसेच बांदा शहरात चौकाचौकात पोलीस कर्मचारी तैनात होते. अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते. 

शहरात महामार्गावर मोटारीतून इंग्लड येथील दोन पर्यटक प्रवास करणारे पोलिसांनी ताब्यात घेतले. महामार्ग वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक उमाकांत पालव, पोलीस हवालदार मनीष शिंदे, दादासो पाटील यांनी या पर्यटकांना ताब्यात घेऊन बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. हे विदेशी पर्यटक मुंबई येथून गोव्याच्या दिशेने जात होते. त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना गोव्याच्या दिशेने रवाना करण्यात आले. इन्सुलि पोलीस तपासणी नाक्‍यावर चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: England Tourist Arrested In Banda Due To Curfew Sindhudurg Marathi News