गायीच्या शेणापासून पणत्या, गोमूत्रापासून बनवले सॅनिटायझर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 November 2020

गाईच्या शेणापासून पर्यावरणपूरक पणत्या आणि गोमूत्रापासून सॅनिटायझर संशोधन करून विकसित केले आहे.

राजापूर (रत्नागिरी) : तालुक्‍यातील सोलगाव येथील पंडित पंचगव्य गुरुकुलने गाईच्या शेणापासून पर्यावरणपूरक पणत्या आणि गोमूत्रापासून सॅनिटायझर संशोधन करून विकसित केले आहे. पंडित पंचगव्य गुरुकुलने केमिकलचा कोणताही वापर न करता तयार केलेल्या पणत्या आणि सॅनिटायझरमुळे पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करता येणार आहे.

पंडित पंचगव्य गुरुकुलच्या सुहास आणि सई पंडित यांनी पर्यावरणपूरक पणती विकसित केली आहे. गाईच्या शेणापासून पणती तयार करताना मूलतानी मातीचा वापर केला जातो. त्यामुळे ही पणती पूर्णपणे जळत नाही. तिचा पुनर्वापर करणे शक्‍य आहे. एक किलो शेण आणि चारशे ग्रॅम मुलतानी माती यांचा वापर करून पणती तयार करता येते. एक किलो शेणापासून सत्तर पणत्या तयार होतात. या पणत्याना चांगला प्रतिसाद मिळाला. 

हेही वाचा -  आता घड्याळाची टिकटिक होणार वेगाने -

कोरोनाच्या विषाणूचं संक्रमण होऊ नये, म्हणून विविध उपाययोजनांसह सॅनिटायझरचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. सद्यस्थितीत मार्केटमध्ये मिळणारे सॅनिटायझर केमिकलयुक्त असतात. मात्र, पंडीत पंचगव्य गुरूकलने केमिकल नसलेले सॅनिटायझर विकसित केले आहे. सांगली येथील त्यांच्या काही मित्रांनी गोमूत्राचा उपयोग करून सॅनिटायझर तयार केले. त्यांच्याकडून माहिती घेवून पंचगव्य गुरूकूलमध्ये सुमारे दोनशेहून अधिक बाटल्या सॅनिटायझर तयार केल्याची माहिती पंडीत यांनी दिली.  

पर्यावरण पूरक पणतीची वैशिष्ट्ये

- पूर्णपणे केमिकलविरहित          

- मुलतानी मातीमुळे पुनर्वापर

- गोपालन व्यवसाला प्रोत्साहन    

- गायीच्या शेणालाही किंमत

 

सॅनिटायझरची वैशिष्ट्ये

- गोमूत्र,कडुनिंबाचा वापर      

- केमिकलचा वापर नाही

- त्वचेला कोणताही अपाय नाही  

- पोटामध्ये गेल्यास अपाय नाही

हेही वाचा - दोन्ही काँग्रेसला सत्ताबदलाचे वेध ; भाजपमधून कोण करणार बंडखोरी ?

"गोपालनकडे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून ओळखले जाते. गाईचे शेण आणि गोमूत्रापासून विविध पदार्थ बनवून त्याद्वारे अार्थाजन करणे शक्‍य आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी गोपालनाकडे पाहिल्यास भविष्यामध्ये गोपालनाला चालना मिळू शकते."

- श्रीमती पंडित

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: environmental diwali festival celebrated in ratnagiri creative activity from from cow duck