दापोलीत लवकरच साकार होणार शिवरायांचा अश्वारूढ पुतळा 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

दापोली शहरात छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा बसविण्यात येणार असल्याचे स्वप्न 25 वर्षे दापोलीकरांना दाखविण्यात येत होते; मात्र दापोलीत शिवरायांचा पुतळा काही उभा राहिला नाही.

दाभोळ : दापोली शहरात उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविण्यासाठी चबुतऱ्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, दापोली शहरात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळ्याचे दापोलीकरांचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. 

दापोली शहरात छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा बसविण्यात येणार असल्याचे स्वप्न 25 वर्षे दापोलीकरांना दाखविण्यात येत होते; मात्र दापोलीत शिवरायांचा पुतळा काही उभा राहिला नाही. शिवसेनेचे नेते व पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या पुढाकाराने दापोली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसविण्याची घोषणा केली. नुसतीच घोषणा केली नाही तर या पुतळ्यासाठी विविध कंपन्यांच्या सीएसआर निधीतून दापोली नगरपंचायतीला 55 लाखांचा निधीही मिळवून दिला. तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी या परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी 74 लाखांचा निधीही नगरपंचायतीकडे वर्ग केला होता. 

हे पण वाचा ओबीसी समाज मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यास सहकार्य करणार ; संभाजीराजे छत्रपती

 मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असलेल्या दापोली शहरातील केळसकर नाका परिसरातील आरक्षण क्रमांक 15 (शिवस्मारक) या जागेमध्ये हा शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असून, हा पुतळा बसविण्यासाठी चबुतऱ्याचे काम पूर्णत्वास आले आहे. छत्रपती शिवरायांचा ब्रॉन्झचा पुतळा तयार करण्याचे काम मुंबई येथील मे. सुरुची आर्ट दहीसरच्या पाचरणेकर यांना देण्यात आले असून, त्यासाठी 26 लाखांचा खर्च येणार होता. मात्र हा पुतळा 12 फुटांऐवजी 13 फूट झाला असल्याने या खर्चात 4 लाख 50 हजारांची वाढ झालेली आहे. या वाढीव खर्चाला नुकतीच दापोली नगरपंचायतीच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे. 

हे पण वाचाउच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण  

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: equestrian statue of Lord Shiva will soon be realized in Dapoli