सिंधुदुर्गात काजूपासून इथेनॉल निर्मितीसाठी शासनाचा पुढाकार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मे 2019

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात 22 लाख टन काजू बोंड उत्पादित होते; मात्र तो वाया जातो. त्यापासून इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प या जिल्ह्यात उभारण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. याबाबतच्या अभ्यासासाठी, संशोधनासाठी 10 जणांची एक समिती शासन निर्णयाद्वारे जाहीर झाली आहे, अशी माहिती या समितीचे सदस्य तथा बॅंकचे संचालक अतुल काळसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात 22 लाख टन काजू बोंड उत्पादित होते; मात्र तो वाया जातो. त्यापासून इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प या जिल्ह्यात उभारण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. याबाबतच्या अभ्यासासाठी, संशोधनासाठी 10 जणांची एक समिती शासन निर्णयाद्वारे जाहीर झाली आहे, अशी माहिती या समितीचे सदस्य तथा बॅंकचे संचालक अतुल काळसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

श्री. काळसेकर म्हणाले, ""घसरत चाललेला काजू बी चा दर हा सध्या सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्‍न आहे. यावर मात करण्यासाठी यापूर्वी अनेक प्रयोग झाले. गोव्याच्या धर्तीवर मद्यार्क निर्मितीसाठी अनेक नियम निकष परवानग्यामुळे यश मिळाले नाही. पेट्रोल आणि डिझेलमध्ये 10 टक्के इथेनॉल वापरण्यात येते ते इथेनॉल येथील काजू बोंडापासून तयार करण्यास वाव आहे. त्यासाठी आता शासनाने पुढाकार घेतला आहे. याच्या अभ्यासासाठी राज्य शासनाने एक दहा सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. यामध्ये माझ्यासह समितीचे अध्यक्ष म्हणून हरिश कांबळे, सुनील उकडीवे यांचा समावेश आहे. राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी याविषयी पुढाकार घेतला असून अभ्यास कमिटी शासनाकडे हा अहवाल लवकरच सादर करणार आहे.'' 

 ""काजू बोंडापासून ज्यूस निर्मिती त्यानंतर अल्कोहोल निर्मिती किंवा काजू फेणी निर्मितीचा अनेक चर्चा झाल्या. शासनाने त्यासाठी प्रयत्नही केले; मात्र परवानग्यांच्या आणि नियमांचा पूर्ततामध्ये या प्रयत्नांना अपयश आले. म्हणून आता शासनाने इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प या जिल्ह्यात उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.'' 

- अतुल काळसेकर

जिल्ह्याच्या कोणत्याही विकासकामांमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे कायमचे योगदान आहे. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी उसा पाठोपाठ काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. शासनाच्या या इथेनॉल प्रकल्प निर्मितीच्या पुढाकारामध्ये जिल्हा बॅंकेचेही मोठे सहकार्य आहे, म्हणूनच सहकार क्षेत्राच्या माध्यमातून हा प्रकल्प या जिल्ह्यात प्रत्येक तालुक्‍यात उभारावा यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. या प्रकल्पासाठी पद्मविभूषित जे. बी. जोशी यांनी संशोधनात्मक मदतीची ग्वाही दिली आहे. अणुभट्टी विकसित करताना त्या कामातही त्यांचे योगदान होते तसेच विज्ञान परिषदेचे अध्यक्षही आहेत, असेही श्री. काळसेकर यांनी सांगितले. 

सिंधुदुर्गनगरीत आज कार्यशाळा 
या पार्श्‍वभूमीवर पद्मविभूषीत शास्त्रज्ञ जे. बी. जोशी यांच्या उपस्थितीत आज (ता. 17) दुपारी साडेतीन वाजता सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बॅंक येथे चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यात जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर, बॅंकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी व बॅंकेचे सर्व संचालक सहभागी होणार आहेत. यामध्ये काजू उत्पादक शेतकरी व तज्ज्ञांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. काळसेकर यांनी केले आहे. 

..तर शेतकऱ्यांना फायदा 
येथील काजू उत्पादन लक्षात घेता 22 लाख मेट्रिक टन काजू बोंड उत्पादित होते. त्यातील नाममात्र म्हणजे 4 ते 5 टक्केच काजू बोंडावर प्रक्रिया होते व अन्य काजू वाया जातात. हे या इथेनॉल प्रकल्पासाठी वापरले गेले तर या बोंडला प्रतिकिलो 20 रुपये दर मिळेल आणि त्यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल, अशी अर्थक्रांती करण्याचा शासनाचा मनोदय आहे, असेही श्री. काळसेकर म्हणाले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ethanol manufacture from Cashew Nut in SIndhudurg