नारगोली गाळमुक्त; धरण पुनर्जीवनाचा दापोली पॅटर्न 

मुझफ्फर खान
सोमवार, 1 जुलै 2019

"एकीचे बळ मिळते फळ' या म्हणीचा प्रत्यय दापोलीला आला. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दापोली नगर पंचायतीने लोकसहभागातून 53 लाख रुपये उभे केले. 900 ग्रामस्थांनी गाळ काढण्याच्या कामात योगदान देत नारगोली धरण गाळमुक्त केले. शासनाचे विविध विभाग, सर्व राजकीय पक्ष, विविध संस्था यांच्या सहकार्यातून नावीण्यपूर्ण नागरी-ग्रामीण लोकसहभागाचा दापोली पॅटर्न यशस्वीपणे राबविण्यात आला. नगर पंचायतीने जल व्यवस्थापनाचा नवा आदर्श घालून दिला आहे. 

"एकीचे बळ मिळते फळ' या म्हणीचा प्रत्यय दापोलीला आला. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दापोली नगर पंचायतीने लोकसहभागातून 53 लाख रुपये उभे केले. 900 ग्रामस्थांनी गाळ काढण्याच्या कामात योगदान देत नारगोली धरण गाळमुक्त केले. शासनाचे विविध विभाग, सर्व राजकीय पक्ष, विविध संस्था यांच्या सहकार्यातून नावीण्यपूर्ण नागरी-ग्रामीण लोकसहभागाचा दापोली पॅटर्न यशस्वीपणे राबविण्यात आला. नगर पंचायतीने जल व्यवस्थापनाचा नवा आदर्श घालून दिला आहे. 

दापोली शहराला एप्रिल ते जूनचा पाऊस पडेपर्यंत पुरेशा प्रमाणात पाणी उलपब्ध होत नाही. त्यामुळे टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. शहर व परिसरामध्ये सरासरी वार्षिक पर्जन्यमान 2700 मी. मी. इतके आहे तरीही टंचाईची परिस्थिती निर्माण होते. यावर मात केली. 

पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करणे, धरण व व पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना पर्यटनाच्या माध्यमातून उत्पन्नाचा आर्थिक स्त्रोत निर्माण करणे, अशा उद्देशाने आखणी केली. शहराला कोजाई बंधारा, नारंगोली बंधारा आणि नारंगोली धरण येथून पाणीपुरवठा होतो. कोडजाई बंधाऱ्याची साठवण क्षमता कमी आहे.

मार्चमध्ये बंधारा कोरडा पडतो, इतर ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजना या बंधाऱ्यावर आधारित आहेत. त्यामुळे मुबलक पाणीपुरवठा होत नाही. बंधाऱ्यावरील शहराची पाणीपुरवठा योजना जुनी आहे. पाईपलाईन जुनी, जीर्ण व नादुस्त झाली आहे. नारगोली बंधाराही नादुरूस्त आहे. त्यालाही अनेक ठिकाणी लिकेज आहेत. त्याची साठवण क्षमताही कमी आहे. एप्रिल, मेमध्ये हा बंधारा कोरडा पडतो. नारगोली धरणातील साठवण क्षमतेचा पूर्ण वापर होत नाही.

साठवण क्षेत्रामध्ये अनेक उंच टेकड्या आहेत. सांडवा व भिंत नादुरूस्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणत पाणी जाते. पाणी झिरपण्याचे प्रमाण जास्त आहे. मार्च, एप्रिल, मेमध्ये अत्यंत कमी पाणीसाठा उपलब्ध होतो. गेल्या वर्षी दापोली तालुक्‍यात पाण्याचे संकट उभे राहिले. आहे. विहिरींची पाण्याची पातळी कमी झाली. 

टंचाईवर शाश्वत मात करण्यासाठी नगर पंचायतीने दापोली संवर्धन कार्यक्रमाअंतर्गत नारगोली धरण पुनर्जीवन मोहीम हाती घेतली. 7 मार्च 2019 ला गाळ काढण्याचे काम सुरू केले. 8 एप्रिल 2019 पासून कामाला गती आली. 5 जून 2019 ला गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले. 

दापोली शहर पाणीपुरवठा योजना 

 • नगर पंचायतीच्या 9 पाणी साठवण टाक्‍या आहेत. त्यामध्ये 18 लाख लिटर पाणी साठवले जाते. 
 • पालिकेच्या मालकीचा जलशुध्दीकरण प्रकल्प आहे. त्याची क्षमता 4.88 एमएलडी इतकी आहे. 
 • दररोज 2 एमएलडी पाणी शहराला पुरवले जाते. एप्रिल ते पाऊस पडेपर्यत 3 ते 5 दिवसांनी पाणीपुरवठा होतो. 

नारगोली धरणाची माहिती 

 • 1974 ला धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. 
 • 1978 ला ग्रामपंचायतीकडे हस्तांतरण 
 • साठवण क्षमता - 35 द.ल.घ.मी 
 • धरणाच्या भीतीची लांबी - 185 मीटर 
 • धरणाची उंची - 14.85 मीटर 
 • पाणलोट क्षेत्र - 2.56 चौ.किमी 

कामातील महत्त्वाचे टप्पे 
मोहिमेअंतर्गत लोकसहभागातून नारगोली धरणाची साठवण क्षमता वाढविली. गाळ काढून धरणाचे खोलीकरण करण्यात आले. रुंदीकरण करण्यात आले. धरणाची पाणी गळती रोखण्यात आली, भिंत दुरुस्त करण्यात आली. सांडवा दुरुस्त करण्यात आला. 

 • धरणातील गाळाचे - 56,220. घनमीटर 
 • खोलीकरण, रूंदीकरण - 77.703.5 घनमीटर 
 • एकत्रित परिमाण -133.923.5 घनमीटर 
 • उपलब्ध झालेले पाणी -133 एमएलडी 

अशी वापरली सामुग्री 

 • जे.सी.बी. 29 दिवस 
 • 70 क्षमतेचा पोकलेन - 54 दिवस 
 • 200 क्षमतेचा पोकलेन - 89 दिवस 
 • डंपर - 223 दिवस 
 • इंधन व मशिनरीचे भाडे : 53 लाख 

दापोली शहराच्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करणे, धरण व व पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांना पर्यटनाच्या माध्यमातून उत्पन्नाचा आर्थिक स्त्रोत निर्माण करणे. नागरी व ग्रामीण भागातील लोकसहभागातून नावीण्यपूर्ण दापोली पॅटर्न राबविणे या उद्देशाने आम्ही नारगोली धरण पुनर्जीवन मोहीम हाती घेतली होती. त्यात आम्हाला यश आले. 

- स्वप्नील महाकाळ, पाणीपुरवठा अधिकारी 

भविष्यात धरण परिक्षेत्रात पर्यटनातून नगरपंचायत व परिसरातील शेतकरी व गावकरी यांना उत्पनाचे साधन मिळवून देणे, उद्यान विकसित करणे, जलतरण तलाव बांधणे सांडव्यावर कृत्रीम धबधबे, शांत निसर्गरम्य निवारे उभे करणे, पक्षी मित्र, प्राणी मित्र, निसर्गप्रेमी यांना निसर्ग निरीक्षणासाठी प्रक्षेत्र विकसित करणे ही कामे प्रामुख्याने हाती घेण्यात आली. 

- महादेव रोडगे, मुख्याधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Excavation of Mud from Nargoli Dam special story