कोकण रेल्वे मार्गावरील धोकादायक दरडींची ड्रोनच्या साह्याने पाहणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 एप्रिल 2019

एक नजर

  • कोकण रेल्वे मार्गावरील धोकादायक दरडींवर ड्रोनच्या साह्याने पाहणी सुरू.
  • दरडग्रस्त पंचवीस ठिकाणांची ड्रोन आणि बूम लिफ्टच्या साह्याने पाहणी. 
  • केंद्राच्या सुरक्षा समितीकडून मिळालेल्या सूचनांचे पालन केले जात असून १५ जूनपासून पावसाळी गस्त.
  • पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन सज्ज. 
  • कोकण रेल्वेचे अध्यक्ष संजय गुप्ता यांच्यासह केंद्रीय सुरक्षा पथकाकडून रेल्वे मार्गाची तपासणी. 

रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावरील धोकादायक दरडींवर ड्रोनच्या साह्याने पाहणी सुरू झाली आहे. दरडग्रस्त पंचवीस ठिकाणांची ड्रोन आणि बूम लिफ्टच्या साह्याने पाहणी केली आहे. केंद्राच्या सुरक्षा समितीकडून मिळालेल्या सूचनांचे पालन केले जात असून १५ जूनपासून पावसाळी गस्त सुरू होईल, असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगितले. 

पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन सज्ज होत आहे. रोहा ते मडुरा पावणेचारशे किलोमीटरचा भाग रत्नागिरी विभागीय 
कार्यालयांतर्गत येतो. कोकण रेल्वेचे अध्यक्ष संजय गुप्ता यांच्यासह केंद्रीय सुरक्षा पथकाने नुकतीच रेल्वे मार्गाची तपासणी केली. दऱ्या-खोऱ्यातून जाणाऱ्या मार्गावर अनेकवेळा दरडी कोसळतात. तीन वर्षात एकही दुर्घटना घडलेली नाही. खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्‍यात डोंगरभाग आहे. अधिक पावसामुळे दरडी कोसळून माती मार्गावर येते. त्यामुळे वाहतूक बंद झाली की, त्याचा फटका रेल्वे प्रशासनाला बसतो. यापूर्वी निवसर, पोमेंडी येथे वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत होत्या. काही कोटी रुपये खर्च करुन त्यावर कायमस्वरुपी उपायोजनाही केली आहे. मागील तीन वर्षात किरकोळ घटना वगळता मोठी घटना घडलेली नाही.

दुर्घटना टाळण्यासाठी रेल्वे मार्गावरील उंच दरडींची बूम लिफ्टद्वारे पाहणी होते. बूममध्ये कर्मचारी बसून चाचपणी केली जाते. याद्वारे माथ्याचा भाग तपासता येतोच, असे नाही. बूम लिफ्टबरोबर द्रोणच्या साह्याने या दरडीची पाहणी करण्यास सुरवात केली आहे. दरडींची माती ठिसूळ झाल्याचे कॅमेरामध्ये दिसते. त्यानंतर उपाय करता येऊ शकतात. दासगाव,मेढे सावर्डेसह आठ ते दहा जागांवर द्रोणने तपासणी केली. हा प्रयोग कोकण रेल्वे मार्गावर प्रथमच केला आहे. दरडीचे शुटिंग कॅमेरात कायमस्वरुपी राहील्यामुळे त्याची बारकाईने तपासणी होते. माणसाला शक्‍य नाही, ते कॅमेऱ्यामुळे शक्‍य होईल असे रेल्वे अधिकाऱ्यांचे मत आहे. दरड कोसळण्याची शक्‍यता, तडे जागणे, दरडीतील दगडी कोसळण्याची शक्‍यता याची तपासणी शक्‍य आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Explore the dangerous tunnels on the Konkan Railway route with a drone