esakal | कोकणात अतिमुसळधारेचा इशारा; नागरिकांना सर्तकतेच्या सुचना
sakal

बोलून बातमी शोधा

कोकणात अतिमुसळधारेचा इशारा; नागरिकांना सर्तकतेच्या सुचना

कोकणात अतिमुसळधारेचा इशारा; नागरिकांना सर्तकतेच्या सुचना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, आज अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. शुकनदीने पातळी ओलांडल्यामुळे खारेपाटणला पूरस्थिती आहे. संततधारेमुळे करूळ घाटरस्ता (Karul Ghat) खचला. तो वाहतुकीस बंद केला आहे. जिल्ह्यातील अनेक मार्गांवर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. खारेपाटण परिसरातील शेकडो एकर भातशेती पाण्याखाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास स्थिती गंभीर बनणार आहे. दरम्यान, हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. extreme-levels-of-flood-in-Kokan-sindhudurg-rain-update

जिल्ह्यात काल (ता. ११) रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. नदीनाले दुथडी आहेत. मुसळधारेचा पहिला तडाखा तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाला बसला. घाटरस्ता पहाटे खचल्याने एकेरी वाहतूक होती. मात्र, त्यानंतर मार्ग २६ जुलैपर्यंत बंदचा निर्णय प्रशासनाने घेतला. वैभववाडी तालुक्यात मुसळधारेने शुकनदीने धोक्याची पातळी ओलांडली. पाणी खारेपाटण शहरात सकाळीच पुराचे पाणी शिरले. व्यापाऱ्यांनी दुकानातील साहित्य दुसरीकडे हलविण्याचा प्रयत्न केला. दुपारपर्यत संपूर्ण खारेपाटणमध्ये पुराचे पाणी शिरले होते. सायंकाळी उशिरापर्यत ७० हून अधिक दुकानांमध्ये पाणी शिरले. या भागातील ६५ एकरहून अधिक भातशेती पाण्याखाली आहे. खाडीलगतच्या २५ गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. धालवली, पोंभुर्ले, मालपे, मणचे गावांमध्ये पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील बसस्थानक आणि अनेक मार्ग पुराच्या पाण्याखाली गेले.

कणकवली तालुक्यातील गड आणि जानवली या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहे. कलमठ-आचरा मार्गावर पुराचे पाणी साचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. वैभववाडी तालुक्यातील शुक, शांती, करूळ, कुसुर, अरुणा या सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. वैभववाडी-उंबर्डे मार्गावर झाड कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. दोडामार्ग तालुक्याला मुसळधारेने झोडपून काढले. काही छोट्या पुलांवरून पुराचे पाणी वाहत आहे. भेडशी कॉजवेवरून पुराच्या पाण्यातून वाहून जाणारी मालवाहतूक रिक्षा स्थानिक युवकांनी धाडस दाखवित पाण्याबाहेर काढली.

खारेपाटणला तडाखा

*शुकनदीने धोक्याची पातळी ओलांडली

*खारेपाटणमध्ये सकाळपासूनच पाण्यात वाढ

*शहरातील सर्व रस्ते पाण्याखाली

*बसस्थानक पाण्याखाली

*खाडीलगत २५ गावांना पुराचा धोका

*शहरातील ७० हून अधिक दुकाने पाण्याखाली

*आचरा-कलमठ मार्गावर पुराचे पाणी

मुसळधार वैभववाडीत, पूर खारेपाटणमध्ये

वैभववाडी तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. तालुक्यातील शांती, करूळ, कुसुर, अरुणा यासह विविध नद्यांचे पाणी पुढे शुकनदीला मिळते. हे सर्व पाणी खारेपाटण खाडीला जाते. त्यामुळे वैभववाडीत मुसळधार पाऊस पडतो; त्यावेळी खारेपाटणला पुराचा धोका अधिक असतो.

पावसाचा जोर राहिल्यास धोका गंभीर

पावसाचा जोर कायम राहिल्यास पुराचा धोका गंभीर होण्याची शक्यता आहे. खारेपाटण खाडीलगत असलेली अनेक गावे पुराच्या विळख्यात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गावांतील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

अतिमुसळधारेचा इशारा

प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार १२ ते १६ जुलैपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे. विजा चमकण्याचीही शक्यता आहे. आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळा. घराबाहेर किंवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. अतिमुसळधार व अतिवृष्टीच्या परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी रहा.

हेही वाचा- स्पर्धा परीक्षेचा मार्ग वेळीच बदलला; निर्माण केला ‘केकोबा’ नावाचा बॅण्ड

पायी किंवा वाहनाने प्रवास करू नका. घराबाहेर पडणे अत्यावश्यक असल्यास निघण्यापूर्वी अधिकृत स्त्रोतांकडून हवामानाची, रेल्वेची व रस्ते वाहतुकीची आणि पाणी तुंबलेल्या ठिकाणांची माहिती घ्या. विजा चमकत असल्यास झाडाखाली उभे राहू नये. मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रिक वस्तूंपासून दूर राहावे. पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा, असे दक्षता घेण्याचे आवाहन मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

loading image