चाकरमान्यांचा ओघ सुरूच; पण 'अशी' होत आहे गैरसोय 

अनिकेत जामसंडेकर
रविवार, 2 ऑगस्ट 2020

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी 7 ऑगस्टपर्यंत गावी येण्याची अंतिम तारीख निश्‍चित झाली आहे.

खारेपाटण - गणेशोत्सवासाठी 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी निश्‍चित झाल्यानंतर मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांनी आजपासून सिंधुदुर्गची वाट धरली आहे. यात खारेपाटण चेकपोस्टवर नोंदणी, आरोग्य तपासणीसाठी प्रचंड गर्दी झाली आहे. चाकरमान्यांच्या वाहनांच्या रांगा दोन ते तीन किलोमिटरपर्यंत लागल्या आहेत. 

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी 7 ऑगस्टपर्यंत गावी येण्याची अंतिम तारीख निश्‍चित झाली आहे. तसे ठराव देखील बहुतांश ग्रामपंचायतींनी घेतले आहेत. त्यामुळे चाकरमान्यांची धावपळ सुरू झाली असून खासगी आराम बस तसेच इतर वाहनातून आपापल्या गावी दाखल होत आहेत. आजपासून मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होऊ लागल्याने त्याचा ताण खारेपाटण चेकपोस्टवरील महसूल, आरोग्य आणि पोलिस यंत्रणेवर आला आहे. गावी येणार्‍या प्रत्येक चाकरमान्यांची नोंदणी, ई-पास तपासणी, आरोग्य तपासणी, हातावर शिक्के मारणे आवश्यकता वाटली तर कोविड रॅपिड टेस्ट या फेर्‍या पार पाडल्यानंतर चाकरमान्यांना सिंधुदुर्गात प्रवेश दिला जात आहे.

हे पण वाचा - टेरेसवर खेळत असताना मुलासोबत घडली दुर्देवी घटना

 

चेकपोस्टवर मोठ्या संख्येने चाकरमानी येत आहेत. मात्र नोंदणी आणि तपासणी केंद्रांवर अपुरी बैठक आणि मंडप व्यवस्था असल्याने दिवसभरात चाकरमानी आणि तेथील कर्मचार्‍यांत वादंगाचेही प्रकार निर्माण झाले होते. गणेशोत्सव कालावधीत चाकरमान्यांचा ओघ वाढता असल्याने, त्यानुसार जादा कर्मचारी नियुक्त करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून व्हायला हवी होती, अशीही अपेक्षा चाकरमान्यांकडून व्यक्त होत आहे.

 
संपादन- धनाजी सुर्वे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: facility not available for konkan people