मिरकरवाडा बंदर सुसज्ज; पण मत्स्योत्पादनात घसरण

राजेश कळंबटे
मंगळवार, 18 जून 2019

रत्नागिरी - कोकण किनारपट्‌टीवरील नैसर्गिक आणि मासे उतरवण्यासाठी सुरक्षित मिरकरवाडा बंदरावरून होणारी मच्छीची उलाढाल घटली आहे. हे बंदर सुसज्ज बनविण्यासाठी कोट्यवधीचा खर्च होत असताना उत्पादनातील घट चिंताजनक आहे. सात ते आठ हजार मेट्रिक टनाने ही घट झाल्याचे मत्स्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.

रत्नागिरी - कोकण किनारपट्‌टीवरील नैसर्गिक आणि मासे उतरवण्यासाठी सुरक्षित मिरकरवाडा बंदरावरून होणारी मच्छीची उलाढाल घटली आहे. हे बंदर सुसज्ज बनविण्यासाठी कोट्यवधीचा खर्च होत असताना उत्पादनातील घट चिंताजनक आहे. सात ते आठ हजार मेट्रिक टनाने ही घट झाल्याचे मत्स्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. समुद्रात मासळीच मिळत नसल्याने बंदरावर ती आणणार कोठून असा प्रश्‍न मच्छीमार विचारत आहेत.

वातावरणातील बदलांचा दुरगामी परिणाम मत्स्योत्पादनावर होत आला आहे. यापूर्वी 2014-15 या आर्थिक वर्षात अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्याची पुनरावृत्ती पुन्हा यावर्षी झाली आहे. मिरकरवाडा या बंदरामध्ये पाचशेहून अधिक मच्छीमारी नौका उभ्या करण्याची क्षमता आहे. मिरकरवाडा आणि तालुक्‍यातील विविध भागामधून आलेल्या नौका वगळता जिल्ह्यातील अन्य मच्छीमारही समुद्रात पकडून आणलेली मासळी इथे उतरवतात. कोकण किनारपट्‌टीवरील सुरक्षित आणि मच्छीमारांना व्यवस्था असलेले मिरकरवाडा बंदर आहे. येथे दरही चांगला मिळत असल्याने मच्छीमार इकडे वळतात.

काही परराज्यातील नौकांकडूनही मासळी उतरवली जाते. काही कोटींची उलाढाल बंदरावरुन होते. मागील पंधरा वर्षात 2010-11 साली मिरकरवाडा बंदरात सर्वाधिक 51 हजार मेट्रिक टन उत्पादन मिळाले होते. त्यानंतर आतापर्यंत एवढे उत्पादन झालेले नव्हते. गेल्या नऊ वर्षात 41 हजार मेट्रिक टनापर्यंतच आहे. गेल्या चार वर्षात पुन्हा उतरंड लागली आहे.

गतवर्षी 32 हजार टनापर्यंत उत्पादन होते. यावर्षीही त्यात घट झाल्याचे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले. हंगामाच्या सुरवातीला निर्माण झालेली वादळी स्थिती, ऑक्‍टोबरपासून ट्रीगरफिश माशांचे आक्रमण, पर्ससिननेटद्वारे मासेमारीला बंदी यासह परजिल्ह्यातून येणाऱ्या नौकांवरील बंदीचा परिणाम उत्पादन घटण्यावर होत असल्याचे मच्छीमारांकडून सांगण्यात येत आहे. मिरकरवाडा बंदर मच्छीमारांसाठी सुसज्ज बनविण्यात येत असल्याने उत्पादन वाढविण्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय स्थानिकांना घ्यावे लागणार आहेत.

मासळी कमी मिळाल्याने यावर्षी मच्छीमारांची स्थिती ना नफा ना तोटा अशीच आहे. बदलते वातावरण आणि ट्रीगर फिशचे आक्रमण कारणीभूत ठरले आहे.

- पुष्कर भुते, मच्छीमार

वर्ष मत्स्योत्पादन (मेट्रिक टन)
* 2013-14 43,852
* 2014-15 28,886
* 2015-16 38,428
* 2016-17 37,313
* 2017-18 32,316
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fall in fish production in Mirkarwada Port