गव्याच्या हल्ल्यात सिंधुदुर्गात शेतकरी ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 मार्च 2019

मालवण - गव्याच्या हल्ल्यात नांदोस गावकरवाडा येथील एक शेतकरी ठार झाला. सूर्यकांत अनंत कोरगावकर (वय ५२) असे त्यांचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या दरम्यान घडली. 

मालवण - गव्याच्या हल्ल्यात नांदोस गावकरवाडा येथील एक शेतकरी ठार झाला. सूर्यकांत अनंत कोरगावकर (वय ५२) असे त्यांचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या दरम्यान घडली. 

नांदोस गावकरवाडा येथील सूर्यकांत कोरगावकर शेती करतात. यावर त्यांची उपजीविका आहे. ते दुपारी काजूच्या रोपांना डोंगराळ भागातील शेततळ्यात पाणी घालण्यास गेले होते. याचवेळी जंगलातील गव्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेतच ते घरी आले. कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना तत्काळ पेंडूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. 

या घटनेची माहिती मिळताच कुडाळचे वनक्षेत्रपाल पी. जी. कोकीतकर, वनपाल रामचंद्र मडवळ, वनरक्षक सारीक फकीर, जयश्री शेलार यांनी नांदोस येथे घटनास्थळी जात पंचनामा केला. या घटनेची माहिती पोलिस पाटील श्री. काळसेकर यांनी कट्टा पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक विनीत चौधरी घटनास्थळी रवाना झाले. पोलिस उपनिरीक्षक डॉ. बालाजी सवंडकर यांच्यासह कट्टा पोलिस दूरक्षेत्रचे रुक्‍मांगत मुंडे, नितीन शेडगे तपास करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer dead in Gava attack in Nandos