आमची शेतीच नष्ट होतेय ; कोकणातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 November 2020

जुने मातीचे बंधारे पाण्याच्या प्रवाहात फुटले असून मोठे भगदाड पडल्याने शेकडो एकर दुबार पीक घेण्यात येणारी भातशेती नापिक बनली आहे. 

मंडणगड : मंत्री महोदय, खाडीचे खारे पाणी शेतात घुसल्याने आमची शेतीच नष्ट होत चालली असून आमच्या उपजीविकेचे साधनच हिरावले जात आहे. शेकडो एकर जमीन नापिक बनत चालली आहे. त्यामुळे आमच्यावर शेती व भूमिहीन होण्याची वेळ आल्याची कैफियत उंबरशेत सरपंच व शेतकरी रमेश बोर्ले यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासमोर मांडली. मंडणगड पंचायत समितीत भेटीदरम्यान खाडीकिनाऱ्यावरील गावांच्या व्यथा सत्तार यांनी जाणून घेतल्या. 

हेही वाचा - दिवाळीचा बाजार अवघ्या 59 रुपयांत -

महसूल, ग्रामविकास, खारभूमी, बंदरविकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी मंडणगड तालुक्‍याचा दौरा केला. त्यावेळी खाडी किनाऱ्यावरील गावांतील नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या. उंबरशेत, कोंडगाव, पणदेरी, शिपोळे बंदर येथील नागरिकांनी आपले म्हणणे त्यांच्यासमोर मांडले. जुने मातीचे बंधारे पाण्याच्या प्रवाहात फुटले असून मोठे भगदाड पडल्याने शेकडो एकर दुबार पीक घेण्यात येणारी भातशेती नापिक बनली आहे. 

पाणथळ क्षेत्र असल्याने येथील शेतकरी भात, पावटा, मुळा, उडीद, तूर अशी बारमाही उत्पादने घेत असे; मात्र मागील काही वर्षांपासून खाडीचे पाणी अडवणाऱ्या बांधाला अनेक ठिकाणी भगदाड पडल्याने खारे पाणी शेतात घुसत आहे. त्यामुळे या ठिकाणची जमीन नापिक बनत चालली. उत्पादन घटले, शेती ओसाड पडू लागली. दरम्यान, खारभूमी बंधाऱ्यांचा मापदंड शिथिल करून मंडणगड तालुक्‍यातील खाडीपट्ट्यातील गावांमध्ये बंधारे बांधण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल.

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शासन यावर ठाम निर्णय करेल. आगामी तीन महिन्याच्या कालावधीनंतर यावर आश्वासक कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना दिली. आमदार योगेश कदम, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, सभापती स्नेहल सकपाळ, उपसभापती प्रणाली चिले, तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, गटविकास अधिकारी एम. दिघे आदी उपस्थित होते. 

हेही वाचा -  आता प्रवासी बॅगांचा पॅटर्न बदलला ; चार हजार प्रकार ग्राहकांसाठी -

जिल्ह्यात हजारो हेक्‍टरमध्ये खारे पाणी 

दरम्यान, जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी तालुक्‍यातही खाडीचे पाणी शिरल्याने हजारो हेक्‍टर शेतजमिन दरवर्षी पाण्याखाली जाते. त्यामुळे येथील शेतकरीही बंधारा बांधण्याची मागणी करत आहेत. काही ठिकाणी बंधारे मंजूरही झाले आहेत. मात्र, त्याची पूर्तता करण्यात प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी कमी पडत आहेत. रत्नागिरी तालुक्‍यातील पोमेंडी, सोमेश्‍वर, गुरुमळी, गावडेआंबेरे, मावळंगे, गावखडी येथील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. 
 
एक दृष्टिक्षेप

अब्दुल सत्तार यांचा मंडणगड तालुक्‍याचा दौरा 
- खाडी किनाऱ्यावरील नागरिकांनी मांडल्या व्यथा 
- खाडीचे पाणी अडवणाऱ्या बांधाला भगदाड 
- खारे पाणी शेतात घुसून जमीन होतेय नापीक 
- खारभूमी बंधाऱ्यांचा मापदंड शिथिल करा 
- खाडीपट्ट्यातील बंधाऱ्यांसाठी धोरणात्मक निर्णय घेणार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer in kokan faced problem related to farming said to abdul sattar in mandangad ratnagiri