esakal | लॉकडाउनमध्ये शोधली बाजारपेठ; कडू कारल्याने शेतक-याचे आयुष्य झाले गोड

बोलून बातमी शोधा

लॉकडाउनमध्ये शोधली बाजारपेठ; कडू कारल्याने शेतक-याचे आयुष्य झाले गोड
लॉकडाउनमध्ये शोधली बाजारपेठ; कडू कारल्याने शेतक-याचे आयुष्य झाले गोड
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कणकवली : सध्याच्या लॉकडाउनमुळे बाजारपेठा विस्कळीत झाल्या आहेत. यामध्ये तयार कृषी उत्पादने शेतामध्येच सडून वाया जात आहेत. अशा निराशादायक स्थितीत हताशपणे बसून राहण्यापेक्षा गोठोस (ता. कुडाळ) येथील संभाजी साळवी या शेतकऱ्याने दुचाकी घेऊन गावागावात, वाडी वस्तीवर जाऊन आपल्या शेतामधील कारल्याची विक्री सुरू ठेवली आहे. एवढेच नव्हे तर व्हॉट्‌सॲप ग्रुप करूनही ग्राहकांपर्यंत कारली पोच करत आहेत.

दरवर्षी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या संभाजी साळवी यांनी यंदा दोन गुंठे क्षेत्रात कारल्याची लागवड केली. त्यापासून यंदा त्यांना एक टनापर्यंतचे उत्पादन मिळाले. कारल्याचे वेल बहरात आले असतानाच कोरोना विषाणूंच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनची कार्यवाही सुरू झाली. अवघ्या तीन ते चार तास बाजारपेठा सुरू राहत असल्याने कारल्यांना मागणीही कमी झाली. याखेरीज माल खरेदीसाठी व्यापारी येईनासे झाले. त्यामुळे दोन गुंठ्यांतील कारल्याचे पीक वाया जाण्याचा धोका निर्माण झाला; मात्र या परिस्थितीत न डगमगता संभाजी साळवी यांनी थेट ग्राहकांपर्यंत जाण्याचा पर्याय शोधला.

हेही वाचा: शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षणातून वगळले; राज्य सरकारने केली निर्णयात दुरुस्ती

दुचाकी घेऊन त्यांनी गावागावांतील घराघरांपर्यंत जाऊन थेट ग्राहकांना घरपोच कारली विक्री सुरू केली. यात गेल्या महिन्याभरात त्यांना खर्च वजा जाता पंधरा हजाराचे उत्पन्न मिळाले आहे. आणखी पंधरा दिवसांत सात ते आठ हजाराचे उत्पन्न मिळेल असा त्यांना विश्‍वास आहे. मधुमेहाने त्रस्त असलेल्या रुग्णांकडून कारल्याची विशेष मागणी केली जाते. हे लक्षात घेऊन साळवी यांनी गोठोस पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांना व्हॉट्‌सॲप ग्रुप देखील स्थापन केला. यामधील मागणीनुसारही ते कारल्याचा पुरवठा करत आहेत.

कलिंगड व इतर पिकांच्या तुलनेत कारली ने-आण करण्याचा खर्च कमी आहे तसेच हमखास मागणीही असल्याने यंदा कारली उत्पादनाने मोठा हातभार दिला. संकरित जातीची कारली लागवड आणि उत्कृष्ट व्यवस्थापन यामुळे अवघ्या दोन गुंठे क्षेत्रात कारल्याचे चांगले उत्पादन घेत आले. यात वडील अनंत साळवी यांनी मोठी मेहनत घेतल्याचीही माहिती संभाजी साळवी यांनी दिली. आपल्या वडिलांनी शेतामध्ये यंदा मका, काकडी, मिरची, दोडकी, वांगी आदींचीही लागवड केली आहे. ही उत्पादनेही घरपोच देण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे श्री. साळवी म्हणाले.

हेही वाचा: कोरोनाबाबत जनजागृतीचा हटके प्रकार; केरळ पोलिसांचा VIDEO व्हायरल