सलाम या बळीराजाला! बैलांसाठी जीव धोक्‍यात, अनोख्या नात्याचे दर्शन

प्रभाकर धुरी
Saturday, 8 August 2020

एकीकडे माणूस माणसाला परका होत असताना त्या शेतकऱ्याने आपल्या बैलांसाठी जीव धोक्‍यात घातल्याची घटना अभूतपूर्वच म्हणावी लागेल. 

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - महापुराचे रौद्ररुप घेवून आलेल्या अस्मानी संकटातही वायंगणतड येथे माणूस आणि प्राणी यांच्या अनोख्या नात्याचे दर्शन बुधवारी घडले. महापुराच्या भीतीने वायंगणतड येथील एका शेतकऱ्याने गोठ्यातील बैलांना जीव धोक्‍यात घालून सुरक्षितस्थळी हलवले खरे; पण तिथल्या लोकांनी त्या बैलांना आसरा देण्यास नकार दिल्याने पुन्हा एकदा जीव धोक्‍यात घालत पुराच्या पाण्याखाली गेलेले दोन पूल पार करत त्यांनी बैलांना घरी आणले. एकीकडे माणूस माणसाला परका होत असताना त्या शेतकऱ्याने आपल्या बैलांसाठी जीव धोक्‍यात घातल्याची घटना अभूतपूर्वच म्हणावी लागेल. 

वाचा - रत्नागिरीतील 'या' तालूक्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस; अनेक गावांचा संपर्क तुटला

माणसांच्या आयुष्यात मुक्‍या प्राण्यांचे स्थान आजही माणसाएवढेच किंबहुना त्यापेक्षा अधिक आहे हेच त्यातून दिसले. वायंगणतड येथील यशवंत परब यांची ही गोष्ट. दोडामार्ग तिलारी मार्गालगत त्यांचे घर. एका बाजूला तिलारी नदी तर दुसऱ्या बाजूला वेळपई नाला. मंगळवारपासून (ता.4) कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे बुधवारी (ता.5) सकाळीच सगळीकडे पुराचे पाणी घुसले. साटेली वायंगणतड मार्गावरील वेळपई आणि आवाडे येथील पूल पाण्याखाली गेले.

तिलारी आणि वेळपईचे पाणी पात्राबाहेर येत शेती बागायतीतून रस्ताभर झाले. अनेक घरांना पाण्याने वेढा दिला. त्यात परब यांचे घर आणि गोठाही होता. गेल्यावर्षी याच तारखेला असाच पूर आला होता. त्यांचे अर्धे अधिक घर पाण्यात होते. यावर्षीही सकाळपासून पुराचे पाणी वाढत होते. गोठ्यातील दोन बैलांची चिंता त्यांना सतावू लागली.

हेही वाचा - रत्नागिरीत कोरोना स्वॅब टेस्टिंग मशिन बंद पडल्याने तपासणी रखडली 

साटेलीत कुणाच्या तरी गोठ्यात बैलांना नेऊन बांधावे म्हणून ते पुराच्या पाण्यातून पलिकडे गेले; पण त्यांच्या बैलांना गोठ्यात बांधून घेण्यास कुणी तयार होईना, म्हणून मग ते तसेच हताश होऊन मागे फिरले. तोपर्यंत मधल्या वाटेवरचे आवाडे आणि वेळपई येथील दोन्ही पूल पाण्याखाली गेले होते. बैलांसकट त्यांनी स्वतःला पाण्यात झोकून दिले. पुलावर खूप पाणी होते. त्यांचा ठाव लागेना. तरीही पोहत त्यांनी पैलतीर गाठले आणि घरापर्यंत आले. त्यांच्या गोठ्यात आणि घरातही पाणी होते. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस अविरत सुरु होता. 

बैलांबद्दलची काळजी त्यांना अस्वस्थ करत होती. त्यामुळे पाणी भरलेल्या गोठ्यात बैलांना न बांधता ते बैलांसाठी वायंगणतड येथील सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरात विस्तारलेल्या गावात बैलांसाठी सुरक्षित आसरा शोधण्यासाठी पुन्हा मार्गस्थ झाले. त्यांच्या चेहऱ्यावर त्यांचे बैलांबद्दल असलेले प्रेम आणि काळजी ठळकपणे दिसत होती. महापुराचे रौद्ररुप घेवून आलेल्या त्या अस्मानी संकटातही माणूस आणि प्राण्यांच्या नव्या नात्याचे दर्शन त्यातून घडले. शिवाय संत ज्ञानेश्‍वरांचे पसायदान ग्रामीण भागातील एका गावात अनुभवायलाही मिळाले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The farmer rescued the oxen from the floodwaters konkan sindhudurg