हत्तींसाठी खोदलेला चर डोकेदुखी, असे का म्हणतायत "हे' शेतकरी?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 मे 2020

पावसाच्या पाण्याच्या लोंढ्यांसोबत खालच्या बाजूला असलेल्या केंद्रे पुनर्वसन वसाहतीतील घरात घुसली आणि घरे गाळ, माती आणि चिखलाने भरून गेली. अख्खी रात्र त्यांनी भीतीच्या छायेत काढली.

साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) - वन विभागाने हत्तींसाठी खोदलेल्या चरातून पावसाळ्यात चिखल, माती आणि दगड पाण्यासोबत केंद्रे पुनर्वसन वसाहतीत येत असल्याने या वर्षी तरी प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यासाठी येथील वन कार्यालयात गेलेल्या केंद्रे प्रकल्पग्रस्तांना वनक्षेत्रपालाच्या भेटीविना परत यावे लागले. बुधवारी (ता. 27) वनक्षेत्रपाल यांच्याशी झालेल्या भ्रमणध्वनीवरील संभाषणादरम्यान त्यांनी काल (ता. 28) प्रकल्पग्रस्तांना सकाळी अकरा वाजता चर्चेसाठी बोलावले होते; मात्र ते तेथे उपस्थित नव्हते. 

केंद्रे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन वीजघर येथे झाले आहे. काही वर्षांपूर्वी हत्तींचा त्या परिसरात वावर वाढल्याने वन विभागाने दोडामार्ग-बेळगाव रस्त्याच्या वरच्या भागातील डोंगरात हत्तींना रोखण्यासाठी खंदकसदृश मोठा चर खोदला; पण दोन वर्षांपूर्वी मुसळधार पावसात त्या डोंगरातील सगळी माती आणि दगड पावसाच्या पाण्याच्या लोंढ्यांसोबत खालच्या बाजूला असलेल्या केंद्रे पुनर्वसन वसाहतीतील घरात घुसली आणि घरे गाळ, माती आणि चिखलाने भरून गेली. अख्खी रात्र त्यांनी भीतीच्या छायेत काढली.

तो गाळ इतका होता की, त्या मार्गावरील वाहतूकही रस्त्यात साचलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे बंद पडली होती. पण त्यानंतरही दरवर्षी त्याच समस्येला प्रकल्पग्रस्तांना तोंड द्यावे लागत आहे. वन विभागाचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागावर आणि बांधकाम विभाग वन विभागावर ढकलून वेळ मारून नेतात. यावर्षी तर त्या कामासाठी पैसेच नाहीत असे सांगून वन विभागाने हात झटकले होते; मात्र भविष्यातील धोका ओळखून केंद्रे प्रकल्पग्रस्तांनी काल (ता. 28) वनक्षेत्रपाल यांची भेट घेण्यासाठी येथील कार्यालय गाठले. त्यांची वसाहत आणि कार्यालय यातील अंतर तीस किलोमीटर असे आहे.

वनक्षेत्रपाल यांनी भेटीसाठी वेळ देऊनही ते कार्यालयात नव्हते. त्यांचा भ्रमणध्वनीही बंद होता. केंद्रेतील अंकुश गावडे, भदी गवस, रामदास नाईक आणि अनेक प्रकल्पग्रस्त वनक्षेत्रपाल यांच्याकडे आपली व्यथा मांडण्यासाठी आले होते. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी, युवासेनेचे उपतालुकाप्रमुख भगवान गवस, लक्ष्मण आयनोडकर आदी उपस्थित होते. श्री. धुरी यांनी उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्याशी संपर्क साधून केंद्रेवासीयांची व्यथा सांगितली. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी करूया आणि त्यांची समस्या सोडवूया, असे सांगितले. श्री. धुरी यांनी संबंधित चरातून पावसाळ्यात गाळ, दगड येऊ नयेत यासाठी वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजना करून देण्याची ग्वाही केंद्रे प्रकल्पग्रस्तांना दिली. 

...तर रस्त्यात चर खोदू 
डोंगरातून येणारे पाणी रोखण्यासाठी बंधारा घालणे आवश्‍यक आहे. वस्तीतून पाणी वाहून नेणारा पाईप मातीने भरला आहे. त्या ठिकाणी मोठा पाईप घालण्याची मागणी केली होती. त्याकडे वन आणि बांधकाम खात्याने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे यावर्षी रस्त्यात मोठा पाईप न घातल्यास रस्त्यात चर खोदून पाण्याला वाट करून देण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers demand sateli bhedshi konkan sindhudurg