Kankavali | निवडणूका तोंडावर आल्यानंतर शेतकऱ्यांची आठवण; परशुराम उपरकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parshuram Uparkar

निवडणूका तोंडावर आल्यानंतर शेतकऱ्यांची आठवण; परशुराम उपरकर

कणकवली - जिल्हा बँक निवडणूक तोंडावर आल्यानंतर जिल्हा बँक अध्यक्ष आणि दूध संघाच्या अध्यक्षांना शेतकऱ्यांची आठवण झाली आहे. जिल्‍हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत आणि दूध संघाचे अध्यक्ष एम. के. गावडे यांनी आयोजित केलेली संयुक्‍त बैठक गेल्‍या चार वर्षात का झाली नाही? असा सवाल मनसे नेते परशूराम उपरकर यांनी आज येथे केला. येथील मनसे संपर्क कार्यालयात श्री. उपरकर बोलत होते. यावेळी यांच्यासोबत वैभववाडी तालुकाध्यक्ष सचिन तावडे, मनविसेचे अमित इब्रामपूरकर, अनिल राणे उपस्थित होते.

श्री. उपरकर म्हणाले, 'जिल्‍हा बँक आणि दूध संघाच्या अध्यक्षांनी जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. राज्‍यात मंत्री असताना नारायण राणे यांनी कणकवलीत चार कोटींची डेअरी उभी केली. गोकुळ दूध संघाला जिल्ह्यात आणून ही शासकीय डेअरी बंद पाडण्याचे काम करण्यात आले. शासकीय डेअरीऐवजी गोकुळला दूध देण्याचे आवाहन त्‍यावेळी केले होते. शेतकऱ्यांसाठी विविध ६० योजना राबविण्याचीही ग्‍वाही देखील दिली होती; पण कुठल्‍याच योजनेची योग्‍य अंमलबजावणी झाली नाही. त्‍यामुळे या योजनांचा लाभ कुठल्‍याच शेतकऱ्याला झाला नाही. उलट दूध कमी असल्‍याचे सांगून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे.'

हेही वाचा: विधान परिषदेचे आश्वासन; निवडणुकीत उमेदवारांची मांदियाळी?

श्री. उपरकर म्‍हणाले, 'पुढे गोकुळ दूध संघाला शह देण्यासाठी नवी खासगी डेअरी सिंधुदुर्गात आणली. या डेअरीने शेतकऱ्यांचे पैसे थकवले. डेअरीकडे जिल्‍ह्‍यातील दूग्‍ध उत्‍पादक शेतकऱ्यांची २ कोटी ६५ लाख रूपयांची देणी थकली आहेत. गोकुळ दूध संघाकडेही शेतकऱ्यांची देणी थकीत आहेत. शेतकऱ्यांचे थकित असलेले पैसे ते केव्हा देणार हे देखील स्पष्‍ट व्हायला हवे. शेतकऱ्यांकडील थकीत देणी देण्याच्या अनुषंगाने सावंत आणि गावडे आता बैठक लावत आहेत; मात्र गेल्‍या चार वर्षात अशी बैठक लावण्यात आली असती तर शेतकऱ्यांना त्‍यांची देणी तरी मिळाली असती; मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर बैठक लावून शेतकऱ्यांना त्‍यांची देणी मिळणार आहेत का?'

loading image
go to top